Yavatmal News: किरकोळ पार्किंगचा वाद विकोपाला; एकाची निर्घृण हत्या, मारेकरी पती-पत्नीला अटक
Yavatmal Crime News : गाडी रस्त्यावर उभी केल्याच्या किरकोळ वादातून एका दाम्पत्याने एक होतकरू व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळच्या कळंब येथे घडला आहे.
Yavatmal Crime News : यवतमाळ : किरकोळ वादातून एका दाम्पत्याने एक होतकरू व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळच्या (Yavatmal Crime News) कळंब येथे घडला आहे. निजमोद्दीन उर्फ देवा निजामोद्दीन देशमुख असे या 42 वर्षीय मृतकाचे नाव आहे. तो कळंबच्या इस्लामपुरा परिसरात राहत होता. नंदकिशोर बाबाराव थोरात (47), आणि त्याची पत्नी माया नंदकिशोर थोरात (45) असे दाम्पत्याचे नावे आहे. दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू केला आहे.
किरकोळ पार्किंगचा वाद विकोपाला
या प्रकरणातील मयत निजमोद्दीन हा आपल्या ई-रिक्षाने कळंब तालुक्यात खेडोपाडी जात गोळ्या-बिस्कीट विक्रीचा व्यवसाय करीत होता. दरम्यान, मंगळवारी कळंब येथील आठवडा बाजार असल्याने तो ई-रिक्षा घेऊन बाजारातील अक्षय मानकर यांच्या दुकानात आला. यावेळी निजमोद्दीनने त्याची ई-रिक्षा बाजूच्या गल्लीत उभी केली होती. त्याचदरम्यान, नंदकिशोर थोरात आणि त्याची पत्नी माया थोरात हे दोघे तिथे आपली व्हॅन (क्रमांक एमएच - 29 - आर - 2456) घेऊन पोहोचले. त्यांना आठवडी बाजारात आपले दुकान गुंडाळून घरी जायचे होते. मात्र रस्ता मोकळा नसल्याने त्यांनी निजमोद्दीनला ई-रिक्षा बाजूला करण्यास सांगितले. निजमोद्दीनने त्यांना बस्स एक मिनिट, मी माल घेतला आहे, लगेच निघतो, असे म्हटले. मात्र यावरून थोरात दाम्पत्याने त्याला शिवीगाळ करीत वाद घालणे सुरू केले.
अखेर या वादाचे रूपांतर विकोपाला गेले. या वादात दाम्पत्याने हातात लोखंडी रॉड घेऊन निजमोद्दीनवर हल्ला चढविला. हल्लात निजमोद्दीन गंभीर जखमी झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती. यावेळी पवन पचकटे या युवकाने वाद सुरू असताना तो सोडविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र त्याच्यावरही थोरात दाम्पत्याने लोखंडी रॉडने हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.
थोरात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल
मारहाणीत निजमोद्दीन गंभीर जखमी झाला. थोरात दाम्पत्याने आपली व्हॅन घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निजमोद्दीन त्यांना थांबविण्यासाठी व्हॅनमागे धाव घेतली. मात्र व्हॅनमध्ये थोरात दाम्पत्याने तेथून पळ काढला. घटनेनंतर उपस्थितांनी निजमोद्दीनला तातडीने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, गुरुवारी सकाळी 6 वाजता त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर मयताचा चुलत भाऊ नसिमूद्दीन करीमोद्दीन देशमुखने कळंब पोलीस स्टेशन गाठून संशयित आरोपी पती-पत्नीविरुद्ध तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून थोरात दाम्पत्याच्या विरोधात पोलिसांनी कलम 302, 324 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभय चौथनकर करीत आहे.
होतकरू युवकाचा हकनाक बळी
आपल्या कामाशी काम ठेवणारा मृत निजमोद्दीन हा कायम आपल्या कामात व्यस्त राहत होता. प्रचंड मेहनत करून त्याने ई-रिक्षा घेतली. तो या ई-रिक्षाने गावखेड्यात जाऊन गोळ्या, बिस्कीट विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्याची मुलगी 10 व्या वर्गात शिक्षन घेत आहे. तर मुलगा 6 व्या वर्गात शिकत आहे. खेडोपाडी गोळ्या बिस्कीट विकून निजमोद्दीन हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र त्याचा हकनाक बळी गेला, अशा भावना कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या