पत्नी आणि दोन मुली पाकिस्तानात अडकून, तिघींना परत आणण्यासाठी यवतमाळमधील तरुणाची धडपड
Yavatmal News : कोरोनाचे सर्व निर्बंध हटल्यानंतरही यवतमाळमधील साजिद सयानी पाकिस्तानातील कराचीत तीन वर्षांपासून अडकून पडलेल्या पत्नी आणि दोन मुलींना भारतात आणण्यासाठी धडपड करत आहे.
यवतमाळ : कोरोनाच्या कठीण काळानंतर आयुष्य रुळावर आले. मात्र, प्रत्येकाचे आयुष्य रुळावर आले असे नाही. यवतमाळ शहरातील जैनाब सयानी ही तीन वर्षांपूर्वी माहेरी पाकिस्तानच्या कराचीला गेली. त्यानंतर कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागला. तेव्हापासून ती आयशा आणि आमना या दोन मुलींसह कराचीत अडकून आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध हटल्यानंतर साजिद सयानी आपल्या पत्नीला आणि दोन मुलींना भारतात आणण्यासाठी धडपड करत आहे. यासाठी त्याने सर्व कागदपत्रांची पूर्तताही केली आहे.
यवतमाळच्या साजिद सयानी या तरुणाचा निकाह 19 ऑक्टोबर 2014 रोजी झाला. इंटरनेटच्या माध्यमातून पाकिस्तानच्या कराची येथील जैनाब या तरुणीशी त्याची ओळख झाली. त्यानंतर ती एक महिन्याच्या व्हिसावर भारतात आली. त्यानंतर पुन्हा सहा महिन्यांसाठी व्हिसा वाढवला. मग एलटीव्हीसाठी अर्ज केला. दरम्यान या दोघांचा संसार सुरु होऊन चार वर्षे झाले. त्यांना आयशा नावाची मुलगीही झाली.
कराचीत जैनाबच्या आईची प्रकृती बिघडली, त्यामुळे 1 सप्टेंबर 2018 रोजी जैनाब, पती साजिद, मुलीला घेऊन कराचीला गेली. त्यानंतर व्हिसा मुदत बाह्य होत असल्याने साजिदला भारतात परत यावं लागलं. तर जैनाबची प्रकृती ठीक नसल्याने आणि ती गर्भवती असल्याने प्रवास करणे अशक्य असल्याने तिला कराचीतच राहावं लागलं. याच दरम्यान जैनाबला दुसरी मुलगी झाली.
कोरोनाची साथ सुरु झाली आणि लॉकडाऊन लागला. परिणामी जैनाबला व्हिसा मिळाला नाही. त्यातच लॉकडाऊनमुळे साजिदला व्हिसासाठी कागदपत्रे पाठवण्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे जैनाब दोन मुलींसह कराचीत अडकून आहे. सध्या मोठी मुलगी 6 वर्षांची तर लहान 3 वर्षांची आहे. जैनाब दोन मुलींना घेऊन तिच्या पतीकडे येण्यासाठी आतुर आहे आणि त्यासाठी सरकारने मदत करावी असे आवाहन करत आहे.
पती साजिद हे देखील आपल्या दोन मुली आणि पत्नीची वाट बघत आहे. तर नातवंडांच्या आठवणीने जैनाबची सासू अस्वस्थ झाली आहे. पती साजिद सयानी यांनी आपल्या लहान मुलगी आमना हिचा व्हिसा काढण्यासाठी न्यायालयामार्फत, एपीडीव्हीड, इलेक्ट्रिक बिल आणि अत्यावश्यक कागदपत्रे ई-मेल द्वारे आपल्या पत्नीला पाठवला आहे. पत्नीने पाकिस्तानमधील भारतीय दूतावास येथे कागदपत्रे पाठवले आहेत. आता प्रतिक्षा आहे ती सर्व कागदपत्रांची पूर्तता होऊन भारतात येण्याची.