(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhavana Gawali : तब्बल एक वर्षानंतर खासदार भावना गवळी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर
यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळीही अॅक्टिव्ह मोडवर आल्या आहेत. भावना गवळी 13 -14 ऑगस्टला जिल्हा दौऱ्यावर आहेत.
यवतमाळ : राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडींनंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे. त्यातच आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. प्रशासकीय पातळीवर त्याची तयारी सुरु झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळीही अॅक्टिव्ह मोडवर आल्या आहेत. भावना गवळी 13 -14 ऑगस्टला जिल्हा दौऱ्यावर आहेत.
कसा असेल भावना गवळी यांचा दौरा?
यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांचे शनिवार 13 ऑगस्टला यवतमाळ येथे दाखल होणार आहे. सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत जनसंपर्क कार्यालय यवतमाळ येथे उपस्थित राहून कार्यकर्यांशी संवाद साधणार आहे.
त्यानंतर 12 वाजता बाभुळगाव येथे नगरपंचायत आढावा बैठक घेणार आहे. दुपारी 1 ते 2 वाजता ग्रामीण भागात अतिवृष्टी झालेल्या सरुळ, वरूड, खर्डा गवंडी या भागातील पुर बाधित भागांची पाहणी करणार आहेत. सायंकाळी 5 वाजता माजी तालुका प्रमुख महादेवराव गर्जे यांच्या उपोषन मंडपाला भेट देणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी विश्रामगृह बाबुळगाव येथे चर्चा करणार आहेत.
रविवार 14 ऑगस्टला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
समर्थवाडी यवतमाळ येथील जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्ते तथा नागरिकांच्या भेटी घेणार आहे.
विदर्भातील शिवसेनेच्या ताकदवान नेत्यांमध्ये खासदार भावना गवळी यांचा समावेश होतो. 2019 मध्ये सलग पाचव्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकून भावना गवळी यांनी आपला राजकीय दबदबा सिद्ध केला.
भावना गवळी हरवल्याची तक्रार
भावना गवळी या वर्षभरानंतर मतदारसंघात जाणार आहे. या अगोदर भावना गवळी हरवल्याची तक्रार काही मतदारांनी केली होती. खासदार मतदार संघात येत नसल्याने मतदारांना मतदारसंघातील सामान्य जनतेला करावे लागत आहे. कुठलीही समस्याची साधे निवेदन द्यायचे असेल तर आम्ही कोणाला द्यावे व आमच्या समस्या कोण सोडणार याबाबत संभ्रम निर्माण झालेला त्यामुळे मतदारांनी खासदार हरवल्याची तक्रार केली होती.
भावना गवळी यांची राजकीय कारकीर्द
खासदार भावना गवळी (जन्म - 23 मे 1973)
- खासदार भावना गवळी वाशिम लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आल्या आहेत.
- शिवसेनेच्या भावना गवळी यांनी 1999 मध्ये वाशिम लोकसभा मतदारसंघातून वयाच्या 25 वर्षी पहिल्या निवडणुकीतच विजयी झाल्या. काँग्रेसचे अनंतराव देशमुख यांचा पराभव केला होता.
- 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर नाईक या यवतमाळ जिल्ह्यातील नाईक घराण्यातील दिग्गज नेत्याला हरवत दुसऱ्यांदा विजय साजरा केला.
- 2009 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर यवतमाळ आणि वाशिम असा लोकसभा मतदारसंघ तयार झाला. यात यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, यवतमाळ, पुसद, दिग्रस विधानसभा आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि वाशिम विधानसभा अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश झाला.
- 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांनी काँग्रेसचे हरिभाऊ राठोड यांचा पराभव करुन 56 हजार 951 मताधिक्याने विजय मिळवला होता.
- 2014 च्या निवडणुकीतकाँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांचा 93 हजार 816 मतांनी पराभव केला.
- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना 1 लाख 17 हजार मतांनी पराभूत केलं.
संबंधित बातम्या :