Yavatmal : पतीच्या विरहाने पत्नीने नऊ महिन्याच्या चिमुकलीसह घेतला गळफास, चिमुकली वाचली पण पत्नीचा मृत्यू
Yavatmal Suicide : यवतमाळमध्ये एका महिलेने आपल्या नऊ महिन्याच्या चिमुकलीसह साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केली.
यवतमाळ : पतीच्या मृत्यूनंतर विरहात जीवन जगत असलेल्या एका महिलेने आपल्या नऊ महिन्याच्या चिमुकलीसह साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. मात्र सुदैवाने फास सैल झाल्याने यात चिमुकली बचावली आहे. ही घटना मार्डी येथे आज सकाळी उघडकीस आली. रोशनी आशिष झाडे ( 24) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर बाळावर सध्या वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
रोशनी हिचे काही वर्षांपूर्वी हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर येथील आशिष झाडे यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक कन्यारत्न सुद्धा जन्माला आले. सुखाने संसार सुरु असताना दोन महिन्यापूर्वी आशिष झाडे यांचा आकस्मित मृत्यू झाला. त्यामुळे ती मार्डी येथे माहेरी आली होती.
पतीच्या निधनानंतर रोशनी ही सतत मानसिक तणावात असायची. आता आपण मुलीचा सांभाळ कसा करायचा अशा विवंचनेत असायची. आज मंगळवारी दिनांक 7 जून रोजी रोशनीचे वडील हे कामानिमित्त बाहेर गेले होते. तर आई घराबाहेर होती. ही संधी साधून रोशनीने सकाळी साडे 6 ते 7 वाजताच्या दरम्यान तिच्या नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन घरातील पंख्याला गळफास साडीने गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळाने ही घटना उघडकीस आली. यात रोशनीचा मृत्यू झाला होता.
फास सैल झाला आणि चिमुकली बचावली...
रोशनी ही आपल्या एका मुलीसह राहात होती. मुलीची जबाबदारी आणि पतीच्या अकाली मृत्यूमुळे रोशनी ही एकाकी झाली होती. त्यातून ती मानसिक तणावात गेली होती. त्यामुळे तिने चिमुकलीसह आत्महत्या करण्याचा निश्चय केला. मात्र दैव बलवत्तर म्हणून चिमुकलीच्या गळ्यातील साडीचा फास सैल झाला. जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा बाळ जिवंत असल्याचे आढळून आले. त्यामुळे बाळाला लगेच वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर तिथे उपचार सुरू आहे. अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत आई व वडिलांचे छत्र हरवल्याने नऊ महिन्यांची चिमुकली पोरकी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रोशनीचा मृतदेह मारेगाव येथे आणण्यात आला असून घटनेचा मारेगाव पोलीस तपास करीत आहे.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.