Yavatmal Crime News: गुगलची मदत अन् विषारी फुलांचा शेक, मुख्याध्यापिका पत्नीनं शिक्षक पतीला संपवलं; मृतदेह जंगलात टाकला पुन्हा जाळला, पण...
Yavatmal Crime News : गेल्या काही काळापासून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली होती. शंतनू दारू पिऊन निधीला त्रास होत होता. शंतनूच्या सततच्या त्रासाला कंटाळून निधीने त्याला संपविण्याचं ठरवलं.

Yavatmal Crime News : यवतमाळ शहराजवळील चौसाळा जंगलात 15 मे रोजी आढळलेल्या जळालेल्या मृतदेहाचा तपास सुरू असताना, हा प्रकार हत्या असल्याचे निष्पन्न झाले झाले. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड होत आहे. मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीने दोन विद्यार्थ्यांच्या मदतीने पतीला विष देऊन हत्या केली, आणि मृतदेह जंगलात नेऊन जाळून टाकला. शंतनू अरविंद देशमुख (32, रा. सुयोगनगर) असे मृत पतीचे नाव असून, निधी शंतनू देशमुख असे आरोपी पत्नीचे नाव आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीप्रमाणे, पत्नीने गुगलच्या साहाय्याने विषारी फुलांचा वापर करून शेक तयार केला आणि तो पतीला पाजून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंतनू हा एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता. तर त्याची पत्नी निधी देशमुख ही देखील त्याच शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होती. या दोघांमध्ये प्रेम जुळलं. दरम्यान वर्षभरापूर्वी दोघांनी प्रेम विवाह केला. त्यानंतर ते आई वडिलांपासून दूर राहू लागले. गेल्या काही काळापासून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली होती. शंतनू दारू पिऊन निधीला त्रास होत होता. शंतनूच्या सततच्या त्रासाला कंटाळून निधीने त्याला संपविण्याचं ठरवलं.
गुगलची मदत अन् विषारी फुलांचा शेक
पतीची हत्या करण्यासाठी निधी देशमुख हिने गुगलवर विष तयार करण्याची माहिती शोधली होती. त्यानंतर तिने महादेव मंदिर परिसरातून विषारी फळं आणि फुलं विकत घेतली. त्या फळं-फुलांचा शेक तयार करून त्यात पॅरासीटामोलच्या सुमारे 15 गोळ्या मिसळल्या. गुगलच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, धोतऱ्याची फुलं अधिक प्रमाणात घालून तीव्र विषारी शेक तयार करण्यात आला. हा शेक दारूच्या नशेत असलेल्या पती शंतनू देशमुख याला पाजण्यात आला. 13 मे रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता शंतनूचा मृत्यू झाला.
जंगलात जाळला मृतदेह
हे कृत्य करण्यासाठी निधीने तिच्या शिकवणी वर्गात येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना विश्वासात घेतले. त्यांना स्वतःची दु:खद कहाणी सांगत मदतीसाठी तयार केलं, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या दोन्ही विद्यार्थ्यांनी निधीच्या सांगण्यावरून शव गाडीने नेऊन चौसाळा जंगलात टाकला. मात्र, पोलिसांच्या भीतीने दुसऱ्या दिवशी या तिघांनी पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकला होता. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला होता.
अंगावरील शर्टचा तुकडा बनला महत्त्वाचा पुरावा
अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या अंगावरील शर्टाच्या बाहीचा तुकडा आणि बटन हे महत्त्वाचे पुरावे म्हणून पोलिसांनी जप्त केले होते. मृत व्यक्तीची ओळख न पटल्याने, संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच यवतमाळ, वाशीम, वर्धा आणि अमरावती ग्रामीण या परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, सनराईज स्कूलमध्ये कार्यरत शिक्षक शंतनू देशमुख हे काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. यानंतर पोलिसांनी शंतनूचे मित्र मनोज झाडे, आनंद क्षिरसागर, राजेश ऊईके आणि सुजीत भांदक्कर यांच्याकडून माहिती घेतली. सर्वांनी सांगितले की, शंतनू 13 मेपासून त्यांच्याशी संपर्कात नाही. 18 मे रोजी, घटनास्थळी सापडलेल्या शर्टाच्या बाहीचा तुकडा आणि बटन हे शंतनू देशमुख यांचेच असल्याचे त्यांच्या मित्रांनी ओळखले, आणि यानंतर या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा होऊ लागला.
आणखी वाचा























