WTO : विकसित देशांकडून वॅक्सिन स्वस्त दरात मिळावी, भारताचे जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रिस्तरीय परिषदेत खडे बोल
WTO 12th Conference : विकसनशील आणि गरीब देशांना सूट दिली जावी आणि अशा कठिण काळात देशांकडून पैसे उकळण्याऐवजी उपचार आणि निदानावर लक्ष केंद्रित केलं जावं असा सल्ला भारताचे वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिला आहे.
WTO 12th Conference : कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) काळातही वॅक्सिनसंबंधी काही फार्मसी कंपन्या नफाखोरीचा विचार करत आहेत हे अत्यंत खेदजनक असल्याची प्रतिक्रिया भारताचे वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. सोबतच, महामारीच्या काळात साथीच्या रोगाचे निदान, औषधोपचार, लसी घेण्यात येणाऱ्या ट्रिप्स (ट्रेंड रिलेटेड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स) संबंधी माफी मिळावी अशी मागणी भारतासोबतच दक्षिण आफ्रिका देशानं केली होती. यासंबंधी बोलताना भारताकडून सविस्तर भाष्य करण्यात आलंय. विकसनशील आणि गरीब देशांना सूट दिली जावी आणि अशा कठिण काळात देशांकडून पैसे उकळण्याऐवजी उपचार आणि निदानावर लक्ष केंद्रित केलं जावं असा सल्ला देत भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या (World Trade Organization) मंचावरुन विकसित देशांना खडे बोल सुनावले आहेत.
महामारीवरील सर्वसमावेशक चाचणी आणि उपचारांची रणनीती साध्य करण्यासाठी विकसनशील देशांना उपचार आणि निदानाची निर्मिती वाढवण्याची गरज आहे. जगभरात पुरेसा आणि परवडणारा साठा उपलब्ध असलेल्या लसींचा आता तुटवडा नाही. खरे तर लसी आता एक्सपायरी डेटमुळे वाया जात आहेत. तरीही आताही ट्रिप्स संदर्भातल्या काही कलमांना विरोध असल्याचं गोयल म्हणालेत. प्रामुख्याने उपचार आणि निदानाचा समावेश करण्यास भारताचा विरोध असल्याचे गोयल यांनी ठणकावून सांगितले. कारण, यामुळे भविष्यात कोणत्याही संकटाचा सामना करायचा असल्यास यासंबंधीचा मार्ग मोकळा होऊ शकेल असं मत त्यांनी मांडलं.
दरम्यान, चर्चेदरम्यान विकसनशील देशांवर कृपा केली जात आहे. अतिरिक्त मदत महामारी दरम्यान केली जात असल्याचं म्हंटलं जातंय. मात्र, विकसनशील देशांना आपण फक्त लस पुरवण्याचे विचार करत आहात, तर याला उशीर झाल्याचं देखील गोयल म्हणालेत. कारण, साथीच्या रोगानं हातपाय पसरलेत. दुसरीकडे, लसीच्या पुरवठ्याची कमतरता नसून भविष्यात अशा महामारीवेळी विकसनशील देशांना त्या कालावधीत गरजा पूर्ण करण्यास सक्षम बनवलं पाहिजे. अशावेळी अनेकांचे जीव जात असतात मात्र त्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी ट्रिप्समधून माफी दिली तरी तो मानवतावादी दृष्टीकोन असल्याची भूमिका भारतानं मांडलीय. दरम्यान, अशावेळी देखील काही फार्मास्युटिकल कंपन्या नफेखोरीचा विचार करतात याचं दुःख असल्याचं गोयल म्हणालेत. महामारी आणि ट्रिप्ससंदर्भात चर्चा पार पडली यावेळी भारतानं आपली बाजू मांडत यातून सूट द्यावी अशी मागणी केलीय.
संबंधित बातम्या :