वॉशिंग्टन: चीनचा भारताला आणि एकूण दक्षिण आशिया असलेला धोका पाहता अमेरिकेने युरोपमधील आपलं सैन्य दक्षिण आशियाकडे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. ब्रसेल्स फोरम 2020 या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ते बोलत होते. यावर्षी कोरोना व्हायरस साथीमुळे ब्रसेल्स फोरमचं आयोजन व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आलं आहे.


जर्मनीमध्ये तैनात असलेलं अमेरिकी सैन्य कमी करुन ते भारत आणि अन्य आशियायी देशांच्या मदतीसाठी पाठवण्याच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर अनेक जाणकारांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे युरोपीय संघाला असलेला रशियाचा धोका वाढेल, असंही अनेक जाणकारांना वाटतं. तर अमेरिकी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी जर्मनीतील सैन्य भारतीय उपखंडाकडे हलवण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घेतला असल्याचं स्पष्ट केलं.


"चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या सध्याच्या कारवाया आणि भारत-चीन सीमेवर सुरु असलेली जमवाजमव पाहता भारताला चीनपासून धोका आहे. फक्त भारतच नाही व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया आणि फिलिपाईन्ससारख्या देशांना असलेला चीनचा धोका लक्षात घेऊन चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मनसुब्यांना आवर घालणं ही काळाची गरज आहे. आम्ही आतापासूनच सज्ज राहिलो तर आम्ही हे निश्चितपणे करु शकू," असंही माईक पॉम्पिओ यांनी स्पष्ट केलंय.


चीनचा भारताला असेलला धोका दूर करणं हे अमेरिकेचा प्राधान्यक्रम असल्याचं अमेरिकी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांच्या निवेदनातून स्पष्ट होतं आहे. दक्षिण चिनी समुद्र आणि भारतीय सीमेवरील त्यांच्या हिंसक चकमकींनी चीनचे मनसुबे स्पष्ट होतात. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय संघाने समन्वयाने पावलं उचलणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.


मागच्याच आठवड्यात अमेरिकी परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ यांनी चीनच्या भारतीय सीमेवरील आगळिकीवर टीका केली होती. दक्षिण चीनी समुद्रात पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हालचाली वाढल्याबद्दलही त्यांनी चीनवर टीका केली होती.


भारत आणि चीन यांच्यातल्या सीमावादात मध्यस्थी करण्याची तयारीही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दर्शवली होती. भारताने मात्र चीन बरोबरचा सीमावाद द्वीपक्षीय समन्वयाने सोडवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार चीनबरोबर वेगवेगळ्या स्तरावर चर्चाही सुरु झाल्या आहेत.


भारताच्या मदतीसाठी अमेरिकी सैन्य भारतीय उपखंडाकडे हलवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर अजून भारत किंवा चीन यापैकी कुणाचीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


संबंधित बातम्या




India-China Face Off | चीनची पुन्हा दगाबाजी, गलवान खोऱ्यात उभारले तंबू