नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर नेमकं झालंय तरी काय, कशी झाली ही घटना हे सगळे प्रश्न देशाला पडले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सीमेवरील हिंसक झटापटीबाबत वक्तव्य समोर आलं. देशातल्या 20 राजकीय पक्ष प्रमुखांच्या बैठकीत त्यांनी सांगितलं की, "आपल्या सीमेत ना कुणी घुसखोरी केली ना कुणी आपल्या पोस्टवर ताबा मिळवला." पण या वक्तव्यात आणि सरकारच्याच अनेक वक्तव्यांमध्ये विरोधाभास आहेत. कारण गलवान खोऱ्यात झालेल्या घटनेवर परराष्ट्र मंत्रालयाचं जे अधिकृत वक्तव्य आलं होतं त्यात याच्या बरोबर विरोधी सूर आहे.


दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची घटनेनंतर फोनवर बातचीत झाली. त्यानंतर भारतीय परराष्ट्र खात्याने हे वक्तव्य जाहीर केलं होतं. 6 जून रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरचा तणाव करण्याबाबत दोन्ही देशांच्या मिलिट्री कमांडरची बैठक झाली. त्यात अनेक मुद्द्यांवर सहमती झाली होती. पण ही प्रगती दिसत असतानाच चिनी बाजूने नियंत्रण रेषेच्या भारतीय हद्दीत एक बांधकाम उभारण्याचा प्रयत्न झाला. यावरुनच वाद सुरु झाला आणि नंतर चीनने आधीच कट केल्याप्रमाणे ही हिंसा घडवली.


आता पंतप्रधान म्हणतात ते खरं की परराष्ट्र मंत्रालय म्हणतं ते खरं हा प्रश्न निर्माण होत आहे. कारण घुसखोरी न करता आपल्या हद्दीत चीन कसं काय बांधकाम करत होता? मोदींच्या वक्तव्यानंतर राहुल गांधींनीही दोन प्रश्न उपस्थित केले आहेत.





मोदींच्या कालच्या वक्तव्यानंतर तिकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलेला दावा भारतासाठी आणखी डोकेदुखीचा आहे.


चीनने गलवान खोरं हा आमच्याच हद्दीत असल्याचा दावा केला आहे. भारताने आमच्या हद्दीत घुसखोरी केली आणि या ठिकाणी बांधकाम सुरु केलं. 6 जूनला झालेल्या बैठकीत इथून निगराणी पथकं हटवण्याचं भारताने मान्य केलं होतं. पण तसं झालं नाही, असं चीनने म्हटलं आहे.





चीन भारतावरच या घटनेचं खापर फोडत आहे. पण मुळात जर आपले पंतप्रधानच म्हणत असतील की घुसखोरी झाली नाही तर मग चीनला आता खोटं तरी कसं पाडायचं?


India-China | सीमाभागात ना घुसखोरी झाली, ना कोणती पोस्ट दुसऱ्याच्या ताब्यात : पंतप्रधान मोदी


या प्रश्नांची उत्तरं कोण देणार?
- नेमकी कुणी कुणाच्या ह्दीत घुसखोरी केली
- जर कुणीच घुसखोरी केली नाही, तर मग गोळीबार न होता सीमेवर 20 जवान कसे शहीद झाले?
- पंतप्रधानांच्या वक्तव्यात आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यात फरक का?


देशाच्या संवेदनशील मुद्द्यावर सर्व राजकीय प्रश्नांना एकत्रित करण्यासाठीच सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. त्यात पंतप्रधानांनी केलेल्या दाव्यावर आता राजकीय पक्षांचं एकमत होतं की त्यातून अजून संभ्रम वाढतोय हे आता पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होईल.


Rahul Gandhi on PM Modi | चीनच्या आक्रमकतेपुढे मोदींची शरणागती : राहुल गांधी


Galwan Valley | गलवान खोरं आमचं, एलएसीसुद्धा आमच्याच भूभागात, चीनच्या उलट्या बोंबा