नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये सीमेवर भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या वादावरुन भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना सल्ला दिला आहे. "आपल्या लोकशाहीची जबाबादारी पंतप्रधानांवर आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी सुरक्षा, सामरिक मुद्द्यांवर जपून बोललं पाहिजे," असं मनमोहन सिंह म्हणाले. यासंदर्भात मनमोहन सिंह यांनी आज पत्रक जारी केलं आहे.


मागील आठवड्यात सोमवारी (15 जून) रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीत एका कर्नलसह भारताचे 20 जवान शहीद झाले होते तर चीनचेही 40 सैनिक ठार झाल्याचं समजतं.



मनमोहन सिंह यांनी पत्रकात म्हटलं आहे की, "15 आणि 16 जून रोजी गलवान खोऱ्यात भारताच्या 20 शूर जवानांनी सर्वोच्च बलिदान दिलं. या शूर सैनिकांनी आपलं कर्तव्य पार पाडत देशासाठी प्राण अर्पण केले. देशाच्या या सुपुत्रांनी अखेरच्या श्वासापर्यंत मातृभूमीचं रक्षण केलं. या सर्वोच्च त्यागासाठी आम्ही या साहसी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाचे कृतज्ञ आहोत. परंतु त्यांचं हे बलिदान व्यर्थ जायला नको.


आपण इतिहासाच्या एका नाजूक वळणावर आहोत. सरकारने उचललेलं पाऊल हे पुढील पिढ्यांसाह मार्गदर्शक असेल. आपल्या लोकशाहीची जबाबादारी पंतप्रधानांवर आहे. पंतप्रधानांनी सुरक्षा, सामरिक मुद्द्यांवर जपून बोलावं.


चीनने एप्रिलपासून आजपर्यंत गलवान खोरे आणि पँगॉन्ग त्सो लेकमध्ये अनेक वेळा घुसखोरी केली आहे. चीनच्या धमकीला आम्ही भीक घालणार नाही. सार्वभौमत्वाला धक्का बसेल असा करार आम्ही स्वीकारणार नाही. पंतप्रधानांनी आपल्या वक्तव्यातून कटकारस्थानी विचारांना बळ मिळू देता कामा नये. हीच ती वेळ आहे, संपूर्ण राष्ट्राला एक होऊन या चीनला प्रत्युत्तर द्यायचं आहे.


भ्रामक प्रचार हा कणखर नेतृत्त्वाला पर्याय असू शकत नाही. खोट्या अवडंबराने खरी परिस्थिती लपत नाही. आम्ही पंतप्रधान आणि केंद्र सरकारला आवाहन करतो की, त्यांनी काळाच्या आव्हानाचा सामाना करावा आणि कर्नल संतोष बाबू आणि भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ होऊ देऊ नका, ज्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली."


राहुल गांधी यांचं ट्वीट


दरम्यान मनमोहन सिंह यांच्या या पत्रकानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की "माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या महत्त्वपूर्ण सल्ला. भारताच्या हितासाठी, आशा करतो की पंतप्रधान मोदी त्यांचा सल्ला विनम्रतेने ऐकतील."