अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणतात... "मोदी है तो मुमकीन हैं"
माईक पॉम्पियो 24 ते 30 जूनपर्यंत भारत, श्रीलंका, जपान आणि दक्षिण कोरियाचा दौरा करणार आहेत. यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भेटणार आहेत.
वॉशिंग्टन : भाजपने लोकसभा निवडणुकीत वापरलेली टॅग लाईन 'मोदी है तो मुमकीन है' पुन्हा चर्चेत आली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी ही टॅग लाईन बोलून दाखवली आहे. माईक पॉम्पियो जून महिन्याअखेर भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. भारत दौऱ्यावर येण्यासाठी उत्सुक असलेल्या माईक यांनी 'मोदी है तो मुमकीन है'चे नारे दिले.
माईक हे बुधवारी यूएस-इंडिया बिझनेस काऊंसिलच्या इंडिया आयडियाज संमेलनात बोलत होते. "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी है तो मुमकीन है असे नारे दिले होते. तर मोदी मेक्स इट पॉसिबल", असं माईक यांनी म्हटलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी घट्ट होत असल्याचं दिसत आहे, असं माईक यांनी सांगितलं.
माईक पॉम्पियो जून महिन्याच्या अखेरिस नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे, असं माईक यांनी सांगितलं. माईक पॉम्पियो 24 ते 30 जूनपर्यंत भारत, श्रीलंका, जपान आणि दक्षिण कोरियाचा दौरा करणार आहेत. यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भेटणार आहेत.
माईक पॉम्पियो यांच्या दौऱ्यात विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील नातेसंबंध आणि घट्ट होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.