एक्स्प्लोर
आठ वर्षांत भरभरुन दिलंत, निरोपाच्या अध्यक्षीय भाषणात ओबामा भावुक
शिकागो : अमेरिकेच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झालेल्या बराक ओबामा यांनी शिकागोमध्ये आपलं अखेरचं अध्यक्षीय भाषण केलं. अमेरिकन जनतेचे आभार मानताना ओबामा काहीसे भावुक झाले.
दोन टर्म म्हणजेच आठ वर्ष ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होते. अमेरिकन नागरिकांनी आपल्याला एक चांगला राष्ट्राध्यक्ष आणि चांगली व्यक्ती होण्यास मदत केली. जेव्हा सामान्य माणूस सक्रिय सहभागी होतो, तेव्हाच बदल शक्य असतो, असं ओबामांनी निरोपाच्या भाषणात म्हटलं.
शिकागोवासियांचं भावनिक आवाहन
पुढील चार वर्षही अध्यक्षपद भूषवण्याचं भावनिक आवाहन ओबामांचं भाषण सुरु असतानाच शिकागोवासियांनी केलं. मात्र जनतेच्या भावनांचा आदर करत ओबामांनी शांतपणे हे शक्य नसल्याचं स्पष्ट केलं.
'अमेरिकेच्या पूर्वजांनी त्यांना अनेक अनमोल गोष्टी दिल्या आहेत. त्यांच्या मदतीने देशाच्या प्रत्येक नागरिकाला मेहनत करुन, घाम गाळत स्वप्न साकार करता येतील.' असं ओबामा म्हणाले. लोकशाहीत एकाचवेळी चढउतारांचा सामना करावा लागतो, त्यामुळे लोकशाहीला एकजुटीची गरज असते, असंही ते म्हणाले.
आठ वर्षात अमेरिका मजबूत
'येत्या दहा दिवसात अमेरिका लोकशाहीच्या कसोटीला सामोरा जाईल. जनतेने निवडलेल्या एका अध्यक्षाच्या हातातून सत्ता जनतेनेच निवडलेल्या दुसऱ्या अध्यक्षाच्या हाती सुपूर्द करण्यात येईल. मी सत्ता स्वीकारल्यापासून आतापर्यंत अमेरिका उत्तम आणि मजबूत झाला आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कुठल्याही अडचणीविना सत्ता सोपवण्याचं वचन दिलं आहे' अशा भावना ओबामांनी व्यक्त केल्या.
दहशतवादाचा बिमोड
गेल्या आठ वर्षात एकाही दहशतवादी संघटनेला अमेरिकेवर हल्ला करण्यात यश आलं नाही. बोस्टन आणि ओरलँडोमध्ये झालेले हल्ले कट्टरवाद किती निष्ठुर असल्याचा प्रत्यय आल्याचं ओबामांनी सांगितलं.
जगातला सर्वात मोठा दहशतवादी मानल्या गेलेल्या लादेनचा उल्लेख करत, गेल्या आठ वर्षात अमेरिकेने असंख्य दहशतवाद्यांना यमसदनी पाठवल्याचं ओबामांनी सांगितलं.
मुस्लिमांशी भेदभाव करण्यास विरोध
आयसिसचाही खात्मा करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करतानाच अमेरिकेला धोका पोहचवण्याच्या बाता करणारा कोणीही सुरक्षित राहणार नाही, असा इशाराही बराक ओबामांनी दिला. मुस्लिम नागरिकांशी केल्या जाणाऱ्या भेदभावाच्या आपण विरोधात आहोत, असं सांगत ओबामांनी ट्रम्पपेक्षा वेगळी भूमिका घेतली.
थँक यू मिशेल
समारोपाकडे जातानाच बराक यांनी मिशेल ओबामांचंही कौतुक केलं. गेल्या 25 वर्षांत ती फक्त चांगली पत्नी आणि आईच नाही, तर बेस्ट फ्रेण्डही झाली. अमेरिकन तरुणांचं मनोधैर्य वाढवण्याबद्दल मिशेल यांचे आभार मानले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement