Ukraine Russia War : खेरसनमध्ये पुन्हा युक्रेनची सत्ता, रशियन सैन्याची माघार; आठ महिन्यांपासून युक्रेन-रशिया संघर्ष सुुरुच
Ukraine Rule In Kherson : आता हळूहळू लोक युक्रेनच्या खेरसन शहरात परतत आहेत. रशियन सैन्याच्या माघारानंतर पोलीस अधिकारी आणि नागरिकही खेरसन शहरात परतले आहेत.
Russian Army Pullout From Kherson : रशियाच्या ( Russia ) सैन्याने युक्रेनमधील ( Ukraine ) खेरसन ( Kherson ) शहरातून माघार घेतल्यानंतर आता पुन्हा हे शहर युक्रेनच्या ताब्यात आलं आहे. आता युक्रेनियन लोक शहरात परतायला लागले आहेत. पुन्हा एकदा या शहरावर युक्रेनची सत्ता आली आहे. युक्रेनच्या लष्करासोबतच पोलीस अधिकारी आणि प्रसारण विभागही शनिवारी खेरसन शहरात परतले आहेत. यासोबतच शहरातील वीजसंकटही लवकरच दूर होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी रशियन सैन्याने प्रांतीय राजधानी खेरसन शहर ताब्यात घेतलं होतं. आता खेरसनमधून रशियन फौजफाटा माघारी परतल्यानंतर आणि युक्रेनियन सैनिक आणि नागरिक शहरातील जल्लोष करताना दिसले. याआधी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचे वक्तव्यही समोर आले होते. आम्ही खेरसन शहर पुन्हा ताब्यात घेऊ, असं त्यांनी म्हटलं होतं.
संघर्षात रशियाची माघार
रशिया आणि युक्रेनमधील युद्धात रशिया आता बॅकफूटवर दिसत आहे. रशियाने शुक्रवारी ( 11 नोव्हेंबर ) घोषणा केली की, युक्रेनच्या खेरसन शहरातून त्यांच्या सैन्याने माघार घेतली आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी डनिप्रो नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरून सैन्य मागे परतलं आहे. रशियन न्यूज मीडिया TASS ने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
झेलेन्स्की काय म्हणाले?
व्लादिमीर झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनियन सशस्त्र दलाच्या विशेष तुकड्या खेरसन शहरात होत्या आणि इतर युक्रेनियन सैन्य देखील शहराकडे कूच करत आहेत. नागरिकही शहरात परतू लागले आहेत. यावर प्रतिक्रिया देत झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे की, खेरसॉनमधील नागरिकांना हार मानली नाही, युक्रेनच्य सैनिकांवर विश्वास ठेवला. शहर सोडलं नाही. इतर शहरं ही रशियन सैन्याच्या ताब्यातून परत मिळवू असा विश्वास झेलेन्स्की यांनी व्यक्त केला आहे.
युक्रेनने 12 वसाहतींवर ताबा मिळवला
युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफने 11 नोव्हेंबर रोजी फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, खेरसन शहरातील 12 वसाहती रशियन सैन्याच्या ताब्यातून सोडवण्यात आल्या आहेत. युक्रेनियन सैन्याने पुन्हा ताबा मिळवलेल्या भागांत डुडचानी, पाइतिख्त्की, बोरोझेंस्के, सदोक, बेझवोदने, इश्चेन्का, कोस्ट्रोम्का, क्रॅस्नोल्युबेत्स्क, कालिनिवस्के, बॉब्रोव्ही कुट, बेझिमेने आणि ब्लागोडात्ने यांचा समावेश आहे. तसेच युक्रेनच्या जनरल स्टाफने रशियन सैन्याचं Ka-52 हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे.