Islamic State: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (United Nations Security Council) सांगितले की, युद्ध गुन्ह्यांसाठी रशियन सैन्याला ताबडतोब न्यायालयीन चौकटीत आणायला हवं. झेलेन्स्की यांनी आपल्या व्हिडिओ संबोधनात रशियन सैनिकांवर (Russian soldiers) द्वितीय विश्वयुद्धानंतरचे सर्वात क्रूर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, रशिया इस्लामिक स्टेटसारख्या (ISIS) दहशतवाद्यांपेक्षा वेगळा नाही.
युक्रेनच्या विविध भागांतून विशेषत: बुका येथून समोर आलेल्या वेदनादायक फोटोनी जगभरात खळबळ उडाली आहे. युद्ध गुन्ह्यांसाठी रशियाविरुद्ध खटला चालवण्याची आणि कठोर निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे. झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वात शक्तिशाली युनिटला मृतदेहांच्या ढिगाऱ्याचे संक्षिप्त व्हिडिओ फुटेज दाखवून "रशियन आक्रमण थांबवा" असे आवाहन केले आहे.
युक्रेनमध्ये निरपराध नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच जागतिक स्तरावर रशियाविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. युक्रेनमधील बुका येथे ताब्यादरम्यान शेकडो नागरिकांची हत्या केल्याचा आरोप रशियन सैनिकांवर आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन सैनिकांना कसाई म्हटले आहे.
दरम्यान, युक्रेनमधील बुका शहरात झालेल्या हत्याकांडावरून रशियाला संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्याची मागणी करण्यात येत आहे. अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, अमेरिकेला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून रशियाचे निलंबन हवे आहे. त्यांनी युक्रेनमध्ये रशियन सैनिकांवर युद्ध गुन्हे केल्याचा आरोप केला आहे.
महत्वाच्या बातम्या