कोलंबो: आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकलेल्या श्रीलंकेमध्ये आता राजकीय अस्थिरताही निर्माण झाली आहे. 41 खासदारांनी आपला पाठिंबा काढून घेतल्यानंतर आता राष्ट्रपती गोताबायांचे सरकार अल्पमतात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणे निधीसोबत होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीच्या आधीच त्या देशाचे अर्थमंत्री अली साब्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
श्रीलंकेत आर्थिक संकट आल्यानंतर त्या देशातील तब्बल 26 मंत्र्यांनी रविवारी रात्री आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रपती गोताबाया यांनी अली साब्री यांची त्या देशाचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. आंतरराष्ट्रीय नाणे निधीसोबत चर्चा करुन देशाच्या आर्थिक संकटावर काही मार्ग निघतो का, काही मदत मिळवता येते का याची चाचपणी करण्याची जबाबदारी अली साब्री यांच्यावर टाकण्यात आली होती. पण अर्थमंत्री पदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर केवळ एकाच दिवसात त्यांनी राजीनामा दिल्याने गोताबायांसाठी हा मोठा धक्का असल्याचं समजलं जातंय.
श्रीलंका आर्थिक संकटाच्या खाईत
श्रीलंकेत आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेवर जे कर्ज आहे, त्यातील 47 टक्के कर्ज बाजारातून घेतले आहे. यानंतर 15 टक्के कर्ज चीनचे, 13 टक्के एशियन डेव्हलपमेंट बँकेचे, 10 टक्के जागतिक बँकेचे, 10 टक्के जपानचे, 2 टक्के भारताचे आणि 3 टक्के इतर ठिकाणचे आहे.
दरम्यान, श्रीलंकेची तिजोरी रिकामी आहे, जनता रस्त्यावर उतरली आहे तर विरोधकांनी राजकीय वातावरण तापवलं आहे.
अन्नधान्यांचे भाव गगनाला भिडले
श्रीलंकेत तांदळाचे दर 250 रुपये किलो, गहू 200 रुपये किलो, साखर 250 रुपये किलो, खोबरेल तेल 900 रुपये आणि दूध पावडर 200 रुपये किलो दराने विकले जात आहे. देशातील अन्नधान्यांचे भाव आता गगनाला भिडल्याचं दिसून आलं आहे. देशाच्या या स्थितीसाठी लोक फक्त श्रीलंकेच्या राजपक्षे सरकारला जबाबदार मानत आहेत. विशेषत: लोक श्रीलंका सरकारची घराणेशाही जबाबदार मानत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Explainer : श्रीलंकेवर कसं आलं आर्थिक संकट? राजपक्षे सरकार जबाबदार? जाणून घ्या
- Jacqueline Fernandez : माझ्या देशवासियांवर जी परिस्थिती आली आहे ती बघवत नाही; श्रीलंकेतील परिस्थितीवर जॅकलीन फर्नांडिसने व्यक्त केल्या भावना
- Sri lanka Curfew : श्रीलंकेत 36 तासांचा कर्फ्यू हटवला, नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार, पंतप्रधान करणार संबोधित