US on India Russia Relation : युक्रेनविरोधात रशियाने युद्ध छेडल्यानंतर अमेरिका हतबल झाली. अमेरिकेच्या हतबल पावित्र्यावर जगभरातून टीका होऊ लागली आहे. तर, दुसरीकडे अमेरिकेकडून रशियाविरोधात वातावरण निर्मिती सुरू आहे. रशिया हा भारतासाठी विश्वासार्ह देश नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा उप-सल्लागार दलीप सिंह हे सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी हा दावा केला. तर, दुसरीकडे रशियाकडून भारतासोबत द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करण्यावर भर दिला जात आहे. 


दलीप सिंह यांनी सांगितले की, चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आगळीक केल्यास रशिया भारताच्या बचावासाठी उभा राहणार नाही, असे त्यांनी म्हटले. भारत रशियाकडून सवलतीच्या दरात इंधन खरेदी करणार आहे. भारताकडून कोणत्याही अमेरिकेच्या निर्बंधाचे उल्लंघन होत नसल्याचेही त्यांनी म्हटले. 


रशियावर असलेल्या निर्बंधामुळे भारताला त्यांच्याकडून होणाऱ्या शस्त्रे, लष्करी उपकरणांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, अमेरिका भारताची लष्करी आणि इंधनाची गरज पूर्ण करण्यास तयार असल्याचे दलीप सिंह यांनी म्हटले. यामुळे भारताचे शस्त्र, लष्करी उपकरण व इंधनावरील अवलंबीत्व एकाच देशांवर राहणार नाही. दीर्घकाळासाठी भारताला याचा फायदा होईल असा दावाही त्यांनी केला. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आगळीक केल्यास रशियाकडून भारताला मदत मिळणार नाही. रशिया चीनच्या बाजूने उभा असेल असा दावाही अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा उप-सल्लागारांनी केला. 


रशियाचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर असताना राष्ट्रीय सुरक्षा उप-सल्लागारांचा दौरा होत आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने संयुक्त राष्ट्र संघात भारताने तटस्थ भूमिका घेतली. त्यानंतर अमेरिकेकडून रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचवेळी रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल विक्री करण्याची तयारी दर्शवली आहे. भारताने या प्रस्तावाबाबत सकारात्मक असल्याची चर्चा आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: