Pakistan Economy: भारताच्या शेजारील देश श्रीलंका आर्थिक संकटात असताना, अशातच आता पाकिस्तानमध्येही राजकीय संकटासोबतच आर्थिक संकटही उभे ठाकले आहे. पाकिस्तानातील राजकीय स्थिरतेचा आलेख घसरत चालला आहे. यामध्येच डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयांमध्येही मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 183.23 वर पोहोचला आहे.


आधीच डबघाईला आलेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था पाहता डॉलरचे वाढते मूल्य हे चिंता वाढवणारे आहे. डॉलरचे मूल्य वाढल्याने आता पाकिस्तानला आपल्या गरजा महागड्या किमतीत आयात कराव्या लागतील. म्हणजेच बर्‍याच अंशी पाकिस्तानही श्रीलंकेच्याच दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानकडे पुढील दोन महिन्यांसाठी पुरेल इतकाच परकीय चलनाचा साठा शिल्लक आहे. पाकिस्तानच्या तिजोरीत फक्त 12 अब्ज डॉलर्स शिल्लक असताना चालू खात्यातील तूटही वाढत असल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने आयातीसाठीही जास्त खर्च करावा लागत आहे. तज्ज्ञांच्या मते हा वेग असाच सुरू राहिला तर पाकिस्तानमध्ये डॉलर लवकरच 200 रुपयांच्या जवळपास पोहोचू शकतो. गेल्या वर्षी मार्चच्या तुलनेत पाकिस्तानी डॉलर आतापर्यंत 27 रुपयांनी महाग झाला आहे. गेल्या 5 वर्षांत पाकिस्तानी रुपया 103 रुपयांवरून 185 रुपयांवर पोहोचला आहे. 


पाकिस्तानी सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 9 महिन्यांत पाकिस्तानची व्यापार तूट 35.39 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या नाहीत तर, पुढील तीन महिन्यांत हा आकडा 45-50 अब्ज डॉलरच्या व्यावसायिक तोट्यापर्यंत पोहोचेल. ज्याची भरपाई पाकिस्तानला सध्याच्या परिस्थितीत करणे शक्य होणार नाही.


संबंधित बातमी: 


Pakistan Politics Crisis: संसद बरखास्त केल्यानंतर विरोधकांनी भरवलं 'आपलं अधिवेशन', इम्रान खानविरोधात अविश्वास प्रस्तावही मंजूर


Pakistan Politics Crisis: पाकिस्तानमध्ये विरोधकांनी नॅशनल असेंब्लीवर केला कब्जा, निवडला नवीन पंतप्रधान


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha