Russia Ukraine War: संघर्ष अजूनही सुरुच, युक्रेनकडून रशियाला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात
Russia Ukraine War: युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध अजूनही सुरु आहे. त्यातच युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी सांगितले की, "युक्रेनकडून रशियाला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे."
Russia Ukraine War: रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यातील संघर्ष अजूनही कायम आहे. त्यातच आता युक्रेनचे राष्ट्रपती व्लादोमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने रशियाला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. माहितीनुसार, युक्रेनच्या सैन्याने देशाच्या पूर्व भागात बखमुत शहरात आणि दक्षिणेकडे झापोरिझिया या शहरांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. मागील काही आठवड्यांपासून युक्रेन सैन्याच्या हालचालींना वेग आला आहे. युक्रेन सैन्याकडून राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेला 'ऑपरेशन शेपिंग' असं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनकडून आता मोठं पाऊल उचलण्यात आलं असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच युक्रेनच्या या भूमिकेवर रशिया कोणतं पाऊल उचलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतिन यांनी शुक्रवारी (9 जून) त्यांच्या एका व्हिडीओमध्ये म्हटलं की, "युक्रेनने आता प्रत्यत्तर देण्यास सुरुवात केली आहे हे रशिया अगदी खात्रीपूर्वक सांगू शकते. परंतु युक्रेनला कोणत्याही प्रकारची हानी करण्यात यश आलेलं नाही." मिसाईलच्या मदतीने युक्रेन रशियाच्या युद्धसामग्रीचं नुकसान करत आहे. तसेच येत्या काही काळात महत्त्वपूर्ण बदल होणार असल्याचं देखील युक्रेनकडून सांगण्यात येत आहे.
'रशियाकडे फारसा वेळ नाही'
युक्रनेचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी यावेळी रशियावर शाब्दिक हल्ले देखील केले. "युक्रेन यावेळी रशियाला सडेतोड उत्तर देईल," असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच "रशियाकडे फारसा वेळ आता शिल्लक नाही," असा इशारा देखील त्यांनी यावेळी रशियाला दिला. "युक्रेनच्या सैन्याने योग्य तयारी करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे आणि युक्रेनच्या लष्करी सैन्याचे प्रमुख सकारात्मकतेने विचार करत आहेत, हे जाऊन पुतिन यांना सांगा," असं देखील झेलेन्स्की म्हणाले.
वर्षभरापासून संघर्ष सुरु
युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला एक वर्ष उलटलं आहे. परंतु तरीही हा संघर्ष अजूनही थांबलेला नाही. यामुळे अनेक निष्पाप लोकांना जीव गगमवावा लागला आहे. तसेच दोन्ही देशांचे यामध्ये बरेच नुकसान झाले आहे. संपूर्ण जगाकडून या दोन्ही देशामधील संघर्ष थांबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याचं चित्र सध्या आहे. त्यातच आता युक्रेनने सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केल्याने आता हा संघर्ष कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.