UAE : यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा यांचे 73 व्या वर्षी निधन, चार दिवसांचा दुखवटा जाहीर
President Sheikh Khalifa Dies : शेख खलिफा यांच्या मृत्यूनंतर यूएईमध्ये चार दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
UAE President Sheikh Khalifa Dies : संयुक्त अरब अमिराती म्हणजे यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान (Sheikh Khalifa bin Zayed Al Nahyan) यांचे आज निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. यूएईच्या मिनिस्ट्री ऑफ प्रेसिडेंन्शिअर अफेअर्सने आज अध्यक्ष शेख खलिफांच्या मृत्यूची बातमी जाहीर केली आहे. शेख खलिफांच्या निधनानंतर यूएईमध्ये चार दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्या आलं आहे. या काळात सर्व सरकारी कार्यालयावरचे ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार असून सर्व कार्यालयं आणि खासगी कंपन्याही बंद ठेवण्यात येणार आहेत.
शेख खलिफा हे गेल्या काही वर्षांपासून आजारपणाशी झुंजत होते. त्यांचे आज निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर आता अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद हे यांच्याकडे यूएईची सूत्र जाण्याची शक्यता आहे. शेख खलिफांच्या मृत्यूनंतर अद्याप यासंबंधी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.
गेल्या काही वर्षांपासून शेख खलिफा यांचा सरकारी कार्यक्रमात किंवा इतर ठिकाणी वावर हा खूपच दुर्मिळ झाला होता. त्यांचे यासंबंधी फोटोही प्रसिद्ध करण्यात आले नाहीत. 2004 साली शेख खलिफा यांचे वडील आणि यूएईचे संस्थापक शेख झाएद यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर यूएईच्या अध्यक्षपदी शेख खलिफा यांची निवड झाली होती. काही वर्षांपूर्वी त्यांना स्ट्रोकचा गंभीर आजार जडला आणि ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिले. शेख खलिफा हे यूएईचे दुसरे अध्यक्ष आणि अबुधाबीचे 16 वे शासक होते. ते शेख झाएद यांचे सर्वात मोठे अपत्य होते.
जगातला सर्वात उंच टॉवर असलेल्या दुबईतील बूर्ज खलिफाचे नाव हे शेख खलिफा यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :