(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Afghanistan चे माजी राष्ट्रपती अशरफ घनी कुटुंबासह यूएईत आश्रयाला, मानवतेच्या दृष्टिकोनातून आश्रय दिल्याच्या यूएईचं स्पष्टीकरण
Afghanistan Crises : अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या कुटुंबासह यूएईत आश्रयाला असल्याच्या वृत्ताला संयुक्त अरब अमीरात (यूएई) च्या विदेश मंत्रालयानं दुजोरा दिला आहे.
Afghanistan News : अफगाणिस्तानात तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या कुटुंबासह अबू धाबीमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. संयुक्त अरब अमीरात (यूएई) च्या विदेश मंत्रालयानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यूएईच्या विदेश मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, मानवतेच्या दृष्टिकोनातून अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबियांना आश्रय दिला आहे. दरम्यान, अशरफ घनी आणि त्यांचे कुटुंबिय अबू धाबीमध्ये नक्की कोणत्या भागांत आहेत, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
संयुक्त अरब अमीरात (यूएई) नं म्हटलं आहे की, त्यांनी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबियांना मानवतेच्या दृष्टिकोनातून स्विकारलं असून त्यांना आश्रय दिला आहे.
अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) यांनी देश सोडला. त्यानंतर तालिबानी (Taliban) दहशतवाद्यांनी काबूलवर कब्जा मिळवला आहे. देश सोडल्यानंतर आता अशरफ गनी यांनी स्वतः खुलासा केला आहे. या खुलासात त्यांना अफगाणिस्तान का सोडावं लागलं हे फेसबूकवर पोस्ट करत सांगितलं आहे.
अशरफ गनी यांनी रविवारी म्हटलं होतं की, "अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबाननं प्रवेश केल्यानंतर आपण होणाऱ्या रक्तपातापासून वाचण्यासाठी देश सोडला. आपल्या फेसबूक पेजवर केलेल्या पोस्टमध्ये गनी म्हणाले की, एका कठिण निर्णयाचा सामना करावा लागला. ज्यात 20 वर्षांच्या युद्धानंतर लाखो काबूल रहिवाशांचे भवितव्य आणि शहराची सुरक्षा धोक्यात आली होती. ज्यात अगोदरच असंख्य लोक मारले गेले होते. रक्तपातापासून वाचण्यासाठी मी विचार केला की, देश सोडणं हा एकमेव पर्याय असेल. तालिबानी जे नंतर काबूलमधील राष्ट्रपती भवनात घुसले. तालिबान आता एक ऐतिहासिक परीक्षेचा सामना करत आहे. तालिबाननं तलवार आणि बंदूकीच्या निर्णयात विजय मिळवला. आता आमच्या देशबांधवांचा सन्मान, समृद्धी आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची आहे. आता तेच अफगाणिस्तानचं नाव आणि सन्मान वाचवतील."
कोणालाही इजा पोहोचवण्याच आमचा हेतू नाही : तालिबान
दुसरीकडे, तालिबानने एक निवेदन जारी करून सांगितलं होतं की, ते चर्चेद्वारे शांततेने काबूलमध्ये प्रवेश करणार आहेत. जबरदस्तीनं प्रवेश करण्याचा कोणताही हेतू नाही. तालिबाननं पुढे म्हटलं की, सरकारशी चर्चा सुरु आहे, आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही. तालिबाननं म्हटलं आहे की, "कोणाच्याही जिवाला, मालमत्तेला, सन्मानाला हानी पोहचणार नाही आणि काबूलमधील नागरिकांच्या जीवाला धोका होणार नाही."
देशावर अतिरेक्यांनी पकड मिळवल्यानंतर घाबरलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयातून पळ काढला. दरम्यान, अमेरिकन दूतावासात हेलिकॉप्टर दाखल झाली आहेत. अफगाणिस्तानच्या तीन अधिकाऱ्यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितलं होतं की, तालिबाननं रविवारी राजधानी काबुलच्या बाहेरील भागात प्रवेश केला होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तालिबान लढाऊ कलाकन, काराबाग आणि पगमन जिल्ह्यात उपस्थित आहेत. अतिरेक्यांनी यापूर्वी जलालाबादवर कब्जा केला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :