दैव बलवत्तर म्हणूनच... विध्वंसकारी भूकंपातून सुखरुप बचावला तीन वर्षांचा निष्पाप जीव, Video Viral
Turkey Earthquake: 19 सेकंदाच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका लहान मुलाचं रेस्क्यू ऑपरेशन केल्याचं दिसतंय.
Turkey Earthquake: तुर्की-सीरिया भूकंपामुळं आतापर्यंत 8 हजार नागरिकांचा मृत्यू, तर 38 हजार नागरिक जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे तुर्कीच्या तब्बल 5 हजार नागरिकांचा तर सीरियाच्या तब्बल 2 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारताकडून 5 विमानं तुर्कीत मदतीसाठी दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे. अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. बचाव कार्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेला 3 वर्षांचा चिमुकला, सुखरुप बचावला
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये एका लहान मुलाचं रेस्क्यू ऑपरेशन केल्याचं दिसतंय. EHA MEDYA नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये बचाव पथक एका तीन वर्षांच्या चिमुकल्याला रेस्क्यू करताना दिसत आहे. तब्बल 22 तासांनंतर एका तीन वर्षांच्या मुलाला ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. ट्विटरवरील व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, "मालट्या येथे इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली दबलेल्या तीन वर्षांचा चिमुकला मीरानला 22 तासांनंतर वाचवण्यात यश आलंय."
पाहा व्हिडीओ :
Malatya'da yıkılan binanın enkazı altında kalan 3 yaşındaki Miran bebek, 22 saat sonra kurtarıldı.#deprem #seferberlik pic.twitter.com/N6fWjT2zPi
— EHA MEDYA (@eha_medya) February 7, 2023
हा व्हिडीओ 19 सेकंदाचा असून, त्यात चिमुकल्याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढत आहे. यावेळी अनेक लोक 'अल्लाह हू अकबर'च्या घोषणा देत आहेत.
अंग धुळीनं माखलेलं, काहीसा भेदरलेला... ढिगाऱ्याखालून बाहेर काढताच चिमुकल्याच्या चेहऱ्यावर गोड हसू
तुर्कीत बचाव कार्य सुरू असताना ढिगाऱ्याच्या खालून एका तीन वर्षांच्या चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. चिमुकला सुखरुप असल्याचं पाहून सर्वांनी आनंद व्यक्त केला. चिमुकल्याचं अंग धुळीनं माखलं होतं. काहीसा भेदरलेला. पण, कोणतीही गंभीर दुखापत झालेली नव्हती. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना तुर्कीतील मालट्या येथील आहे.
तुर्कीसाठी जगभरातून प्रार्थना
सोशल मीडियावर तुर्कीतील विनाशकारी भूकंपाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या तुर्कीचं दृश्य पाहून अंगावर शहारे येतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बचाव पथकाकडून तीन वर्षांच्या चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तुर्कीत बचाव कार्य करणाऱ्या पथकाच्या जवानांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तसेच, चिमुकल्याला वाचवल्याबद्दल त्याचे आभार मानत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :