महाभियोगाचा प्रस्ताव पारित होणारे ट्रम्प तिसरे राष्ट्राध्यक्ष, बाकीचे दोन कोण आहेत?
अमेरिकन कॉंग्रेसमध्ये ट्रम्प यांच्याविरोधात सुरु असलेल्या महाभियोग प्रस्ताव पारित झाला आहे. हा प्रस्ताव 232 विरुध्द 197 या मतांनी पारित करण्यात आला आहे. पण या आधीही दोन राष्ट्राध्यक्षांवर महाभियोगाचा प्रस्ताव पारित करण्यात आला होता.
नवी दिल्ली: अमेरिकन हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हने ट्रम्प यांच्या विरोधातील ऐतिहासिक असा दुसरा महाभियोग प्रस्ताव पारित केला आहे. ट्रम्प यांच्याविरोधातील हा महाभियोगाचा प्रस्ताव 232 विरुध्द 197 मतांनी पारित करण्यात आला. ट्रम्प हे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांच्या विरोधात दोन वेळा महाभियोग प्रस्ताव पारित झाला आहे. तसेच ट्रम्प यांच्या आधीही तीन राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात असा महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
कॅपिटॉल हिलवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्याला ट्रम्प यांनी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर करुन ट्रम्प यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यावरुन ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
दोन वेळा महाभियोग डोनाल्ड ट्रम्प हे असे राष्ट्राध्यक्ष आहेत की ज्यांच्यावर दोन वेळा महाभियोगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. यापूर्वी 2019 साली ट्रम्प यांच्यावर हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह ने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी युक्रेन मुद्द्यावरुन जो बायडेन यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. परंतु या प्रस्तावाला सीनेटने 2020 साली नाकारले होते. सीनेटमध्ये त्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे बहुमत होते.
या आधी तीन राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवून या आधी अॅन्ड्रू जॉनसन (1868), रिचर्ड निक्सन (1973) आणि बिल क्लिन्टन (1998) या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव पारित करण्यात आला होता. अॅन्ड्रू जॉनसन (1868) हे अब्राहम लिंकन यांच्या काळात उपराष्ट्रपती होते. लिंकन यांच्या मृत्यूनंतर ते राष्ट्रपती बनले. कॉंग्रेससोबत चांगले संबंध नसलेल्या अॅन्ड्रू जॉनसन यांच्यावर 1868 साली पहिल्यांदा महाभियोगाचा प्रस्ताव पारित मांडण्यात आला आणि तो दोन्ही सभागृहात पारित करण्यात आला होता. पण नंतर अमेरिकन न्यायालयाने ते अवैध ठरवले आणि अॅन्ड्रू जॉनसन यांनी आपला कार्यकाल पूर्ण केला.
अमेरिकेतच नव्हे तर जगभरात गाजलेल्या वॉटरगेट प्रकरणात राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांच्याविरोधात 1973 साली महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. पण यावर मतदान होण्यापूर्वीच निक्सन यांनी राजीनामा दिला. त्यामुळे यावर मतदान होऊ शकले नाही.
1998 साली बिल क्लिन्टन राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव पारित करण्यात आला. बिल क्लिन्टन हे हिलरी क्लिन्टन यांचे पती आहेत. व्हाइट हाऊसमधील काम करत असलेल्या 22 वर्षीय मोनिका लियोन्स्की या युवतीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मोनिका लियोन्स्की ही बिल क्लिन्टन यांच्यापेक्षा वयाने खूप लहान होती. बिल क्लिन्टन यांनी त्यांच्यावरील आरोप नाकारले. बिल क्लिन्टन यांचे हे प्रकरण प्रचंड गाजले होते.
पण या कारणामुळे बिल क्लिन्टन यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्यात आला नव्हता. बिल क्लिन्टन यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्या विरोधात महाभियोगाचा प्रस्तावास मांडण्यात आला. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हने महाभियोगाचा हा प्रस्ताव पारित केला परंतु सीनेटने हा प्रस्ताव नाकारला होता.