Suella Braverman : भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनच्या मंत्र्याचा राजीनामा, 'हे' आहे कारण
UK Political Crisis : ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी राजीनामा दिला आहे. सुएला यांनी सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचं सांगत राजीनामा दिला आहे.
UK Political Crisis : ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन (Suella Braverman) यांनी राजीनामा दिला आहे. सुएला यांनी सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचं सांगत राजीनामा दिला आहे. गेल्या आठवडाभरात ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस (Britain PM Liz Truss) यांच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या मंत्र्याने राजीनामा दिला आहे. गेल्या आठवड्यात आणखी एका मंत्र्याने राजीनामा दिला होता. याआधी लिझ ट्रस यांनी अर्थमंत्री क्वासी क्वार्टेंग यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. सुएला ब्रेव्हरमन यांनीही आपला राजीनामा ट्विट केला आहे.
ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांचा राजीनामा
सुएला ब्रेव्हरमन यांनी सरकारी दस्तऐवज लीक केल्याचा आरोप आहे. 42 वर्षीय सुएला ब्रेव्हरमन भारतीय वंशाच्या आहेत. मात्र भारताविरोधी वक्तव्य केल्यामुळे त्या गेल्या काही काळापासून चर्चेत होत्या. सुएला ब्रेव्हरमन यांनी आपला राजीनामा ट्विट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, माझ्याकडून चूक झाली आहे. मी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत आहे. ब्रेव्हरमन म्हणाले की, मला माझी चूक लक्षात येताच मी ताबडतोब याची अधिकृत माहिती दिली आणि कॅबिनेट सचिवांना कळवलं. गृहमंत्री या नात्याने मी स्वत:ला यासाठी जबाबदार मानते आणि माझा राजीनामा योग्य आहे.
सुएला यांनी सरकारी दस्तएवज लीक केल्याचा आरोप
गृहमंत्री ब्रेव्हरमन यांनी सरकारी दस्तऐवज प्रकाशनाआधी त्यांच्या सहाय्यकाला पाठवल्याचा आरोप आहे. हे कायद्याचं उल्लंघन आहे. यानंतर पंतप्रधान लिझ ट्रस यांनी ब्रेव्हरमन यांनी राजीनामा मागितला. या महिन्याच्या सुरुवातीला सुएला ब्रेव्हरमन यांनी म्हटलं होतं की, भारतासोबत व्यापार करारामुळे ब्रिटनमध्ये स्थलांतरितांची संख्या वाढेल. भारत आणि ब्रिटन दरम्यान मुक्त व्यापार करारावर बोलणी सुरु असतानाच सुएला यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या भारताविरोधी वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली.
My letter to the Prime Minister. pic.twitter.com/TaWO1PMOF2
— Suella Braverman MP (@SuellaBraverman) October 19, 2022
गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन काय म्हणाल्या होत्या?
भारतीय वंशाच्या ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी मुक्त व्यापार कराराला विरोध करत म्हटलं होतं की, या करारामुळे ब्रिटनमध्ये भारतीय स्थलांतरितांची संख्या वाढेल. शिवाय अनेक भारतीय प्रवासी व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ब्रिटनमध्येच राहतात. ब्रिटीश सीमा अशाप्रकारे भारतीयांसाठी खुली व्हावी म्हणून ब्रिटीश लोकांनी मत दिलं नव्हतं. मला ब्रिटीश साम्राज्याचा अभिमान आहे आणि ते त्याचे अपत्य आहेत.
भारतविरोधी वक्तव्यावर सुएला यांचा यु-टर्न
भारताविरोधी वक्तव्यानंतर सुएला यांनी यु-टर्न घेतला. 'ब्रिटिश भारतीय समुदायाचा सदस्य असल्याचा आपल्याला अभिमान आहे. भारत माझ्या हृदयात आहे, माझ्या आत्म्यात आहे, माझ्या रक्तात आहे.', असं सुएला यांनी म्हटलं होतं.