Sri Lanka Crisis : श्रीलंकेचा पाय आणखी खोलात! पेट्रोल-डिझेलचाही साठा संपला
Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील आर्थिक संकट अधिकच गडद झाले असून इंधन साठाही जवळपास संपुष्टात आला आहे.
Sri Lanka Crisis : आर्थिक संकटाशी दोन हात करत असलेल्या श्रीलंकेसमोरील आव्हाने संपुष्टात येण्याची चिन्हं नाहीत. श्रीलंकेतील इंधन साठा जवळपास संपला असून सरकारने दोन आठवडे इंधन विक्रीवर बंदी घातली आहे. देशात असलेल्या इंधन साठ्यातून सध्या फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. या अत्यावश्यक सेवेत आरोग्य, कायदा-सुव्यवस्था, बंदरे, विमानतळ, अन्नधान्य वितरण आणि कृषी क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. तर, Non-Essential Services 10 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.
वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारचे प्रवक्ते बंडुले गुणवर्धन यांनी सांगितले, सोमवारी मध्यरात्रीपासून आरोग्यासारख्या अत्यावश्यक सेवांना वगळता इतरांना इंधन खरेदी करता येणार नाही. श्रीलंकेकडे सध्या असलेला इंधन साठा हा मर्यादित असून त्याचा योग्य वापर करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही लोकांची माफी मागत असून त्यांच्या गैरसोयीसाठी आम्हाला खेद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळा बंद राहणार
श्रीलंकेतील शाळा बंद राहणार असून आणि खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्यास सांगितले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनादेखील अशाच प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. श्रीलंकेत पहिल्यांदाच इंधनाचा साठा संपला आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल पंपासमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहे. इंधन खरेदीसाठी ग्राहकांना अनेक दिवस रांगेत उभे राहावे लागत आहे.
श्रीलंकेत 1948 मधील स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे देशात अन्नधान्य, औषधं, स्वयंपाकाचा गॅस आणि इंधनासारख्या आवश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे.