Sri Lanka : दिनेश गुणवर्धने श्रीलंकेचे नवे पंतप्रधान, भारतासोबत आहे खास नातं, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात वडिलांची महत्त्वाची भूमिका
Sri Lanka PM Dinesh Gunawardena : श्रीलंकेच्या नवीन पंतप्रधानांचं भारतासोबत खास नातं आहे. त्यांच्या वडिलांनी जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत काम केलं, तर त्यांच्या मोठ्या भावाचं नाव 'इंडिका' होतं.
Sri Lanka PM Dinesh Gunawardena : श्रीलंकेला पंधरावे पंतप्रधान मिळाले आहेत. दिनेश गुणवर्धने यांची श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. दिनेश गुणवर्धने यांचं भारतासोबत खास नातं आहे. त्यांच्या वडिलांनी जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत काम केलं. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर दिनेश गुणवर्धने यांचे वडील डॉन फिलिप रूपासिंघे गुणवर्धने (Don Philip Rupasinghe Gunawardena) यांचा कार्यकाळ चर्चेत आला आहे. त्यांनी साम्राज्यवादविरोधी आंदोलनान सक्रिय सहभाग घेतला. याशिवाय त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात (India Freedom Struggle) वडिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्यासोबतही काम केलं. इतकच नाही तर त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव 'इंडिका' ठेवलं.
डॉन फिलिप यांचं ब्रिटनमध्ये शिक्षण, राजकारणाकडे कल
दिनेश गुणवर्धने यांचे वडील डॉन फिलिप रुपसिंघे गुणवर्धने परदेशात शिकण्यासाठी गेले आणि त्यांच्या शिक्षणादरम्यान ते आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये सर्वात उत्कृष्ट बंडखोर नेते म्हणून प्रसिद्ध झाले. ब्रिटनमध्ये असताना त्यांचा राजकीय सहभाग वाढला. दिवंगत डॉन फिलिप गुणवर्धने यांनी लंडनमध्ये स्वातंत्र्य सैनिक जोमो केन्याटा आणि जवाहरलाल नेहरू यांची भेट घेतली आणि कृष्ण मेनन आणि नेहरूंसोबत इंडियन लीग या साम्राज्यवादविरोधी संघटनेसाठी काम केलं.
पळून जाऊन भारतात गेले आणि स्वातंत्र्यासाठी लढले
डॉन फिलिप 1942 मध्ये भारतात पळून गेले आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला. मात्र, त्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आलं. फिलिप गुणवर्धने यांनी गुरुसामी हे नाव धारण केले आणि त्यांची पत्नी कुसुमा भारतात त्यांच्यासोबत होत्या. त्यांचा मोठा मुलगा भारतात जन्माला आला आणि त्यांनी मुलाचं नाव 'इंडिका' ठेवलं. श्रीलंका गार्डियनच्या वृत्तानुसार, त्यांना 1943 मध्ये श्रीलंकेत परत आणण्यात आले आणि तेथे सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली.
पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांच्यासमोर मोठी आव्हानं
दिनेश गुणवर्धने यांनी शुक्रवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि 17 कॅबिनेट मंत्र्यांसह पंतप्रधानपदाची शपथ घेतली. श्रीलंकेच्या पोदुजाना पेरामुना (SLPP) पक्षाचे खासदार गुणवर्धने यांनी राजधानी कोलंबोमध्ये इतर ज्येष्ठांच्या उपस्थितीत शपथ घेतली. श्रीलंकेची अर्थव्यवस्था सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत असताना दिनेश गुणवर्धने यांची भूमिका महत्त्वाची असेल.