Sri Lanka Economic Crisis: श्रीलंकेत सफरचंद 1200, तर द्राक्षे 1800 रुपये; सामान्य नागरिकांच्या अडचणी संपेना
Sri Lanka News: भारताच्या शेजारील देश श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे. देशात आणीबाणीनंतरही परिस्थिती सुधारलेली नाही.
Sri Lanka News: भारताच्या शेजारील देश श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे. देशात आणीबाणीनंतरही परिस्थिती सुधारलेली नाही. महागाई शिगेला पोहोचली आहे. देशात महागाई आणि कमकुवत चलन यामुळे दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. श्रीलंकेतील नागरिक अलिना फर्नांडो यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, "सध्या श्रीलंकेतील लोक अनेक प्रकारच्या संकटांना तोंड देत आहेत. त्या म्हणाल्या, लोकांकडे पैसा नाही, कमाई नसलेल्या सर्व वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. दैनंदिन खाद्यपदार्थांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत.
त्यांनी सांगितलं की, भाजीपाला, फळे आणि घरातील जीवनावश्यक वस्तूंचे दरही दुप्पट ते तिप्पट झाले आहेत. फळविक्रेता चंदना यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. तेव्हा त्या म्हणाल्या की, आर्थिक संकटामुळे फळांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत.
- सफरचंद - आधी 350, आता 1200 रुपये
- आंबा - पूर्वी 350, आता 700 रुपये
- संत्री - पूर्वी 400, आता 800 रुपये
- अननस - पूर्वी 200, आता 400 रुपये
- द्राक्षे - पूर्वी 1200, आता 1800 रुपये
याशिवाय भाज्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
- बटाटे - आता 340, पूर्वी 250 रुपये
- टोमॅटो - आता 850, पूर्वी 280 रुपये
- पूर्वी गाजर - आता 440, पूर्वी 220 रुपये
- शिमला मिरची - आता 850, पूर्वी 650 रुपये
- कोबी - आता 850, पूर्वी 650 रुपये
- वांगी - आता 480, पूर्वी 180 रुपये
याबाबत अधिक माहिती देताना भाजी विक्रेता सिराने सांगितले की, ''पूर्वी लोक एक किलो माल घेत होते, आता अर्धा किलो घेत आहेत. एवढेच नाही तर डिझेलचे दर वाढल्याने मालही कमी मिळत आहे. माझ्या कर्मचार्यांना पगार देण्यासाठीही मला पैसे मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. भाजीपाला महाग असल्याने लोक घाबरले आहेत. आधी भाज्यांची होम डिलिव्हरीही केली जात होती, मात्र आता डिझेलचे दर वाढल्याने होम डिलिव्हरी केली जात नाही. परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या महिन्यात काय होईल, हेही सांगता येणार नाही.''
गेल्या आठवड्यात लिंबाचे भाव पाचशे रुपये होता
श्रीलंकेत गेल्या आठवड्यात 9 मे रोजी लिंबाचा भाव 500 रुपये किलो होता. भारतीय चलनात ही किंमत सुमारे 125 रुपये प्रति किलो इतकी आहे. सध्या भारताचा एक रुपया श्रीलंकेच्या चार रुपयांच्या बरोबरीचा आहे. त्यानुसार भारतात लिंबू श्रीलंकेच्या तुलनेत तीन-चारपट महाग मिळत आहे. श्रीलंकेत भाज्या आणि फळांचे भाव गगनाला भिडले आहेत. बटाटा 240 रुपये किलो, कांदा 260 रुपये दराने मिळत होता. काही आठवड्यांपूर्वी ज्या दराने एक किलोचा माल मिळत होता, तोच मला आता त्याच किंमतीत अडीचशे ग्रॅम इतका मिळत आहे.