Sputnik Light Vaccine | लसीकरण होणार सुसाट! कोरोनावर रशियाच्या नवीन 'स्पुटनिक लाईट'चा एक डोस पुरेसा, भारतात केव्हा येणार?
रशियाच्या गमलेया (Gamaleya Institute) या संस्थेने कोरोना संसर्गावर स्पुटनिक प्रकारातील नवीन लस 'स्पुटनिक लाईट' (Sputnik Light) विकसीत केली आहे. या लसीचा एकच डोस पुरेसा असल्याचा दावा या कंपनीकडून करण्यात आला आहे.रशियामध्ये या लसीला मान्यता दिली आहे. भारतासारख्या देशात ही लस संजीवनी ठरणार आहे. त्यामुळे या लसीला भारतात केव्हा मान्यता मिळते हे पाहणे महत्वाचे आहे.
मोस्को : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला असून यापुढेही अशा लाट येत राहणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. भविष्यातील हानी टाळायची असेल तर जलद लसीकरण हा एकच पर्याय सध्या आपल्यासमोर आहे. या संदर्भात आता एक सकारात्मक बातमी आली आहे. रशियामध्ये स्पुटनिक लसीचा आणखी एक प्रकार विकसित केला आहे. स्पुटनिक लाईट असं या लसीचं नाव असून याचा एकच डोस पुरा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यावूर्वी रशियन कंपनीची स्पुटनिक व्ही (Sputnik V) बाजारात उपलब्ध आहे.
Introducing a new member of the Sputnik family - a single dose Sputnik Light!
— Sputnik V (@sputnikvaccine) May 6, 2021
It’s a revolutionary 1-shot COVID-19 vaccine with the 80% efficacy - higher than many 2-shot vaccines.
Sputnik Light will double vaccination rates and help to handle epidemic peaks ✌️ pic.twitter.com/BCybe8yYWU
रशियाचा पहिला लस स्पुटनिक व्ही कोविड19 संसर्गाविरोधात 97.6 टक्के प्रभावी आहे, असे वैज्ञानिकांनी सांगितले होते. 3.8 दशलक्ष लोकांच्या आकडेवारीवर ही माहिती आधारित आहे. भारताला स्पुटनिक व्ही लसीचे 1.5 लाख डोस प्राप्त झाले आहेत. पुढील दोन दिवसांत आणखी 1.5 लाख डोस पोहचण्याचा अंदाज आहे.
रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (RDIF) आज (6 मे 2021) स्पुटनिक लाइट या लसीचा एक डोस वापरण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. स्पुटनिक लाइट लसीचा एक डोस कोरोनाव्हायरस विरोधात 80 टक्के कार्यक्षम असल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आरडीआयएफच्या मते रशियाच्या गमलेया संस्थेने तयार केलेली लस कोविड 19 विरूद्ध 79.4 टक्के प्रभावी आहे. स्पुटनिक लाईटची किंमत 10 डॉलरपेक्षा कमी असणार आहे. सध्या या लसीला फक्त रशियात परवानगी मिळाली आहे. कोरोनाविरोधात स्पुटनिक व्ही जगातली पहिली रजिस्टर्ड होणारी लस होती.
आरडीआयएफने एका निवेदनात म्हटले आहे: “स्पुटनिक लाइट लस दिल्यानंतर 28 दिवसानंतर घेण्यात आलेल्या विश्लेषणात्मक आकडेवारीनुसार 79.4 टक्के या लसीची कार्यक्षमता दिसून आली. रशियाच्या लसीकरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 5 डिसेंबर 2020 ते 1 एप्रिल 2021 या कालावधीत हे लसीकरण करण्यात आले होते.
भारतात कधी परवागनी मिळणार?
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटने थैमान घातले असून आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. ऑक्सिजन, औषधं, वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. उपचाराअभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊन लावलं आहे. मात्र, लसीकरण करणे हाच यावर उपाय असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. पण, देशात लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागला आहे. अशात वेगाने लसीकरण करण्यासाठी स्पुटनिक लाईट ही भारतासाठी संजीवनी ठरणार आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार या लसीला केव्हा मान्यता देते हे पाहणे महत्वाचे आहे.