Ukraine Attack Russian Soldiers : रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine Conflict) यांच्यातील संघर्ष सुरुच आहे. 70 दिवसांहून अधिक दिवस दोन्ही देशातील युद्ध सुरु आहे. रशियाचा युक्रेनवर हल्ला सुरुच असून यामध्ये युक्रेन माघार घेण्यास तयार नाही. युद्धात युक्रेन रशियाला चोख प्रतुत्तर देत आहे. आता युक्रेनने रशियन सैन्यावर हल्ला केल्याची माहिती दिली आहे. युक्रेनने रशियन सैन्यावर केलेल्या हल्ल्यात रशियाचे 19 टँक आणि 20 लष्करी वाहनं नष्ट केल्याचा दावा केला आहे. यासोबत युक्रेननं दावा केलाय की, या युद्धात रशियाचे 24 हजार 900 सैनिक मारले गेले असून 1110 टँक आणि 199 विमान गमावले आहेत.
युद्धांत 223 मुलांचा मृत्यू, 400 हून अधिक मूलं जखमी
युक्रेनने असाही दावा केला आहे की, या युद्धात आतापर्यंत 223 लहान मुलांचा मृत्यू झाला असून सुमारे 400 पेक्षा जास्त मुले जखमी झाली आहेत. युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार, युद्धात सर्वाधिक लहान मुलांचा मृत्यू डोनेस्तक प्रांतामध्ये झाला आहे. या ठिकाणी 139 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.
ब्रिटनकडून युक्रेनला 1.6 अब्ज डॉलर अतिरिक्त लष्करी मदत मिळणार
दुसरीकडे, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याशी व्हिडीओ कॉलवर चर्चा केली आहे. यानंतर ब्रिटन सरकारने युक्रेनला अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनने युक्रेनला 1.6 अब्ज डॉलरची लष्करी मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक युद्ध उपकरणे, काउंटर बॅटरी रडार यंत्रणा, जीपीएस जॅम उपकरणे यांचा समावेश आहे. रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात जी 7 नेत्यांची 8 मे रोजी म्हणजेच आज महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीपूर्वी बोरिस जॉन्सन यांनी झेलेन्स्की यांच्यासोबत चर्चा केली.
बोरिस जॉन्सन यांच्याकडून झेलेन्स्की यांचं कौतुक
बोरिस जॉन्सन यांनी झेलेन्स्की यांचं कौतुक केलं आहे. जॉन्सन यांनी म्हटलं आहे की, 'युक्रेन रशियाविरोधात सिंहासारखा लढतोय. येणार्या पिढ्या हे सर्व लक्षात ठेवतील. युक्रेनच्या सैनिकांची संख्या कमी होती. पण एक-एक सैनिक रशियाच्या तीन सैनिकांशी लढत होता. युक्रेनच्या सैन्याने रशियन सैन्याला कीव्हमधून बाहेर काढलं. पुतिन अजिंक्य आहेत हा समज तुम्ही मोडला आहे. एवढेच नाही तर लष्करी इतिहासात तुम्ही तुमच्या देशाच्या जीवनात एक अद्भुत अध्याय जोडला आहे.'
महत्त्वाच्या बातम्या