Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियात घनघोर युद्ध सुरू आहे. युक्रेनकडून रशियन फौजांचा प्रतिकार केला जात आहे. युक्रेनच्या सैनिकांनी रशियाचे रणगाडे उद्धवस्त केले आहे. मोस्कवा युद्धनौका बुडवल्यानंतर युक्रेनने रशियाला आणखी एक धक्का दिला आहे. युक्रेनने रशियाचा अत्याधुनिक रणगाडा टी-90 उद्धवस्त केला आहे. युक्रेनने रशियाला दिलेल्या या प्रत्युत्तरामुळे भारताची चिंता वाढली आहे. रशियन बनावटीचे टी-90 रणगाडा भारतीय लष्कराच्या ताफ्यात आहे.
शत्रूचा रणगाड्यावर हल्ला झाल्यास तो स्वतःचे संरक्षण करू शकेल अशी रशियाच्या T-90 रणगाड्याची रचना करण्यात आली आहे. या रणगाड्यात स्वयंचलित संरक्षण प्रणाली बसवण्यात आली आहे. युक्रेनच्या लष्कराने ड्रोन फुटेज जारी केले असून त्यात त्यांनी 38 कोटी रुपयांचा रशियन रणगाडा उद्धवस्त केला असल्याचाही दावा केला आहे.
रशियन सैन्याकडे सध्या फक्त 100 T-90M रणगाडे
युक्रेनच्या कीव इंडिपेंडंटच्या वार्ताहराने शेअर केलेल्या फोटोत रशियाच्या T-90 रणगाड्याचे अवशेषही दिसत आहेत. युक्रेनच्या ईशान्येकडील खार्किव ओब्लास्ट भागात या रणगाड्यावर थेट हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. रशियन लष्करातील अत्याधुनिक रणगाडा उद्धवस्त केल्याने युक्रेनच्या फौजांचे मनोबल उंचावले आहे.
रशियाने अद्याप आपला स्वयं-चालित T-14 अर्माटा रणगाड्याचा लष्करात समावेश केला नाही. रशियाने T-90 टॅंकची T-90S हा नवा प्रकार जगभरात निर्यात केला आहे. भारतीय सैन्यदलातही टी-90 भीष्म रणगाडे आहेत. त्यांची संख्या आगामी काळात वाढवण्याबाबतही विचार सुरू आहे. त्यामुळेच युक्रेनने रशियाचा अत्याधुनिक रणगाडा उद्धवस्त केल्याने भारताची चिंता वाढली आहे. भारतीय लष्करालादेखील भविष्यात युद्धप्रसंगी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.