Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. दोन्ही देशांमधील युद्ध थांबणार की नाही? याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. आज बेलारूसमध्ये रशिया-युक्रेन यांच्यात चर्चा होणार आहे. परंतु, त्यापूर्वी यक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी रशियाने प्रथम युद्धविराम जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.  
 
रशिया आणि युक्रेनचे शिष्टमंडळ चर्चेसाठी बेलारूसला पोहोचले आहे. बेलारूसच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक फोटो ट्विट करून माहिती दिली आहे की, रशिया-युक्रेन बैठक आयोजित करण्यासाठी मंच तयार करण्यात आला आहे. आता फक्त दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची प्रतीक्षा आहे. परंतु, त्याआधी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाने युद्धविराम जाहीर करण्याची मागणी केली आहे. 


"दोन्ही देशांमधील चर्चेपूर्वी रशियाने युद्धविराम जाहीर करावा. याबरोबरच रशियन सैनिकांनी आपला जीव वाचवून माघारी जावे, युक्रेनला  युरोपियन युनियनचे (EU) सदस्यत्व देण्यात यावे, अशी मागणी झेलेन्स्की यांनी केली आहे. 


युरोपियन युनियन युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा करणार आहे. परंतु, रशियाने या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. युरोपीय संघ आमच्याशी शत्रुत्वाने वागत असल्याचे रशियाने म्हटले आहे. युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा करणे हे धोकादायक आहे, असे रशियाने म्हटले आहे. 


रशियाने गुरूवारी युक्रेनवर हल्ला केला. गुरूवारपासून दोन्ही देशांमधील हे युद्ध अद्यापही सुरूच आहे. रशियन हल्ल्यात आतापर्यंत 102 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्राने केला असून त्यात सात मुलांचाही समावेश आहे.


महत्वाच्या बातम्या