मुंबई: अभिनेत्यांचे रील लाईफ आणि रियल लाईफ हे वेगवेगळं असतं असं म्हटलं जातं. पण सर्वांच्याच बाबतीत ते लागू होतंय असं काही नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनॉल्ड रेगन आणि डोनॉल्ड ट्रम्प यांच्यानंतर राजकारणात यशस्वी झालेल्या अभिनेत्यांच्या यादीत युक्रेनच्या व्होदिमर झेलेन्स्की यांचेही नाव आहे. टीव्ही शोमध्ये कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याने 2019 साली थेट युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं आणि माजी गुप्तहेर असलेल्या आणि रशियाच्या राजकारणावर एकहाती नियंत्रण असलेल्या ब्लादिमिर पुतिन यांना या एकेकाळी कॉमेडियन असलेल्या युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात लढावं लागतंय.
व्होदिमर झेलेन्स्की यांनी 2019 साली निवडणूक जिंकली आणि युक्रेनचे सहावे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. एक कॉमेडियन अभिनेता ते राष्ट्राध्यक्ष असा त्यांचा प्रवास खूपच रंजक आहे.
कसा आहे व्होदिमर झेलेन्स्की यांचा प्रवास
व्होदिमर झेलेन्स्की यांचा जन्म् 25 जानेवारी 1978 रोजी एका ज्यू कुटुंबात झाला. त्यांच्या आजोबांनी दुसऱ्या महायुद्धात रेड आर्मिमध्ये काम केलं होतं. झेलेन्स्की यांचे वडील प्राध्यापक होते. स्वत: झेलेन्स्की यांनी कायद्याची पदवी घेतली पण त्यांचा ओढा हा अभिनयाकडे होता. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी अभिनयाला सुरुवात केली.
अभिनयामध्ये राष्ट्राध्यक्षाची भूमिका
'सर्व्हंट ऑफ द पीपल' या टीव्ही शोमध्ये व्होदिमर झेलेन्स्की यांनी अभिनय केला. हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. या कार्यक्रमात त्यांनी एका शिक्षकाची भूमिका केली होती. हा शिक्षक भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतो आणि नंतर तो राजकारणात येऊन थेट राष्ट्राध्यक्ष बनतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून झेलेन्स्की घराघरात पोहोचले. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत लाखोंची वाढ झाली.
या कार्यक्रमामध्ये व्होदिमर झेलेन्स्की यांनी शिक्षक ते राष्ट्राध्यक्ष असा प्रवास करणाऱ्या व्यक्तीची भूमिका केली. नंतर हीच गोष्ट त्यांच्या खऱ्या आयुष्यातही सत्यात उतरली आणि अभिनय ते राष्ट्राध्यक्ष असा प्रवास त्यांनी पार पाडला. अभिनयाकडे ओढा असलेले व्होदिमर झेलेन्स्की यांनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी राजकारणात भाग घेतला.
सन 2019 सालची निडवणूक त्यांनी लढवण्याचा निर्णय घेतला. त्या निवडणुकीत व्होदिमर झेलेन्स्की यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्रिएटिव्ह व्हिडीओ लोकांपर्यंत पोहोचवले. त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी तीन चतुर्थांश मतं घेतली आणि ते युक्रेनचे सहावे राष्ट्राध्यक्ष झाले.
आपण निवडणूक जिंकल्यावर रशियाशी चांगले संबंध प्रस्थापित करु असं आश्वासन व्होदिमर झेलेन्स्की यांनी दिलं होतं. व्होदिमर झेलेन्स्की निवडून आल्यानंतर रशियाच्या ब्लादिमिर पुतिन यांनी त्यांचे अभिनंदन केलं आणि लगेच पूर्व युक्रेनच्या लोकांना रशियात प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट देण्याचा निर्णय घेतला.
युक्रेनच्या राजधानीचे स्पेलिंग बदलले
युक्रेनची राजधानी कीवचे इंग्रजी स्पेलिंग Kiev असं होतं. झेलेन्स्की सत्तेवर येताच त्यांनी या स्पेलिंगमध्ये बदल केला आणि ते Kyiv असं केलं. Kiev हा रशियन उच्चार होता तर Kyiv हे युक्रेनमधील शहराचे लॅटिन भाषांतर होतं, तेच वापरण्याचा निर्णय झेलेन्स्की यांनी घेतला.
NATO शी जवळीकता वाढवली
रशियाने 2014 साली क्रिमिया ताब्यात घेतल्यानंतर युक्रेन सावध झाला. रशियाला एकट्यानं भिडणं शक्य होणार नाही हे त्या देशाच्या लक्षात आलं. युक्रेन हा नॅचरल गॅसने समृद्ध असल्याने त्यावर आपलं नियंत्रण असावं ही रशियाची सुप्त इच्छा काही लपून राहिली नव्हती. त्यामुळे भविष्यात रशिया पुन्हा आक्रमण करणार हे जाणून असलेला युक्रेन अमेरिकेच्या नेतृत्वाखालील NATO देशांच्या संघटनेमध्ये सामिल होण्यासाठी प्रयत्नशील होता.
युक्रेनचा जर NATO मध्ये समावेश झाला तर तो रशियासाठी धोका असेल, रशियाच्या सीमेवर NATO चे अर्थात अमेरिकेचे सैन्य येणं रशियाला परवडणारे नाही हे रशिया जाणून होता. त्यामुळे पुतिन पुन्हा एकदा संधीच्या शोधात होते. युक्रेनच्या NATO सोबतची वाढलेली जवळीकता रशियाच्या डोळ्यात चांगलीच खुपत होती. पण याच संधीचा फायदा रशियाने घ्यायचा ठरवला आणि आता थेट युक्रेनवर हल्ला केला.
राष्ट्राध्यक्ष स्वत: रणांगणात
व्होदिमर झेलेन्स्की यांनी रशियाच्या या आक्रमणाला जशास-तसं उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. रशियासारख्या मोठ्या देशासमोर युक्रेन ताकदीने उभा आहे. कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही, अशी भूमिका झेलेन्स्की यांनी घेतलीय. आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी ते स्वत: रणांगणात उतरले आहेत. ज्या ठिकाणी रशियाने हल्ले केले आहेत, तेथे त्यांनी भेट दिली आहे. व्होदिमर झेलंस्की यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच ते वेगवेगळ्या देशांसोबत चर्चा करत आहेत.
कोण जिंकणार? कॉमेडियन की गुप्तहेर?
आता युद्धाला तोंड तर फुटलं आहे. युक्रेनच्या तुलनेत रशियाची लष्करी ताकद ही मोठी आहे. पण युद्धाचे निकाल हे सर्वस्वी लष्करी ताकदीवरच अवलंबून नसतात हे अनेकदा सिद्ध झालं आहे. तसं असतं तर 1904-05 साली जपानसारख्या देशाने त्यावेळच्या सोव्हिएतचा पराभव केला नसता, किंवा व्हिएतनामने महासत्ता असलेल्या अमेरिकेला गुडघे टेकायला लावले नसते. युद्धाचा विजय हा एखाद्या देशातील नागरिकांचे आणि महत्त्वाचं म्हणजे राजकीय नेतृत्त्वाची खंबीर मानसिकतेवर अवलंबून असतं.
या युद्धात व्होदिमर झेलेन्स्की यांनी रशियाच्या शक्तीमान अशा पुतिन यांच्याशी भिडायचा निर्णय तर घेतलाय. पण आता व्होदिमर झेलेन्स्की यांची खरी अग्निपरीक्षा ही त्यांच्या राजनयिक नेतृत्वाची असेल. ते किती प्रमाणात अमेरिका, युरोप आणि जगभरातल्या देशांना आपल्याकडे वळवून घेतात त्यावर युक्रेनचे भवितव्य अवलंबून आहे.
संबंधित बातम्या:
- Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन वादावर केवळ संवादातून मार्ग निघेल; पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदींचे आवाहन
- Russia-Ukraine: थोडा जरी आत्मसन्मान शिल्लक असेल तर इम्रान खाननी रशिया दौरा रद्द करावा: शशी थरूर
- Russia-Ukraine Crisis: रशियाचं वर्तन हे 'नाझी जर्मनी'सारखं; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोदिमर झेलन्स्की यांचा आरोप