नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे पंतप्रधान ब्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये महत्वपूर्ण चर्चा झाली. नाटो सैन्य आणि रशियामध्ये असलेले मतभेद हे केवळ पारदर्शक संवादाच्या माध्यमातून सुटू शकतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी स्पष्ट केलं. या दोन नेत्यामध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटांची चर्चा झाली आहे. 


रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई केली आणि युक्रेननेही आता त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. हा वाद चांगलाच चिघळला असून तो आता गंभीर रुप धारण करण्याच्या स्थितीत आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सद्यस्थितीची माहिती पुतिन यांनी मोदींनी दिली आहे.


 






रशियाच्या अध्यक्षांशी बोलताना पंतप्रधानांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्या ठिकाणी अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारत प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी दोन देशांमधील हितसंबंध कायम ठेवण्यावर आणि त्यासाठी सातत्याने संवाद साधण्याच्या गरजेवर भर दिला. 


युक्रेनचे भारताला मदतीसाठी आवाहन
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असं युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोल्खा यांनी म्हटलं आहे. भारताने या प्रश्नावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी तात्काळ संवाद साधायला हवा असंही त्यांनी म्हटलं आहे. युक्रेनच्या राजदूतांनी सांगितलं आहे की, रशियाने युक्रेनची राजधानी कीवजवळ हल्ले केले आहेत. त्यामुळे  आम्ही भारताला मदतीचे आवाहन करतो. जगभरातील हा तणाव कमी करण्यामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची ठरु शकेल.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha