Russia-Ukraine Crisis: एकीकडे रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध जगभरातून केला जात असताना दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे रशियाच्या भेटीला गेले आहेत. इम्रान खान यांच्या दौऱ्यावर जगभरातून प्रतिक्रिया येत असून काँग्रेसचे खासदार यांनी यावरुन त्यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. इम्रान खान यांच्यात थोडा जरी स्वाभिमान असेल तर त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आदर्श घ्यावा आणि रशियाचा दौरा रद्द करुन मायदेशी परतावं असा सल्ला शशी थरुर यांनी दिला आहे. 


काँग्रेस नेते शशी थरुर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “इम्रान खान यांच्यात थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 1970 च्या चीन भेटीदरम्यान चीनने व्हिएतनामवर हल्ला केला होता त्यावेळी जे केलं तेच करतील. इम्रान खान यांनी आपला दौरा त्वरित रद्द करावा आणि मायदेशी परतावं. अन्यथा ते देखील या हल्ल्याचे भागिदार असतील.”


 




भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री अटल बिहारी वाजपेयी हे 1979 साली चीनच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी चीनने व्हिएतनामवर हल्ला केला. त्यामुळे त्याचा निषेध करत वाजपेयींनी आपला दौरा रद्द केला आणि भारतात परतण्याचा निर्णय घेतला.


इम्रान खान रशियाच्या दौऱ्यावर आणि पाकिस्तानची नाचक्की
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी अमेरिका, युरोपसह जगभरातील काही देश एकवटल्याचं दिसून येतंय. पण या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची मात्र नाचक्की झाल्याची घटना घडलीय. या युद्धाच्या धामधुमीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे रशियाच्या भेटीला गेले आहेत. पण त्यांने स्वागत करायला कोणताही मोठा अधिकारी उपस्थित राहिला नाही. जो अधिकारी उपस्थित होता, त्याने इम्रान खान यांचे स्वागत तर केले पण आपण आता उद्या भेटू या असं सांगत त्यांचा लगेच निरोप घेतला. 


युक्रेनचे भारताला मदतीसाठी आवाहन
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असं युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोल्खा यांनी म्हटलं आहे. भारताने या प्रश्नावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी तात्काळ संवाद साधायला हवा असंही त्यांनी म्हटलं आहे. युक्रेनच्या राजदूतांनी सांगितलं आहे की, रशियाने युक्रेनची राजधानी कीवजवळ हल्ले केले आहेत. त्यामुळे  आम्ही भारताला मदतीचे आवाहन करतो. जगभरातील हा तणाव कमी करण्यामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची ठरु शकेल.


संबंधित बातम्या: