मुलांना कोरोना प्रतिबंधक लस नाकातील स्प्रेद्वारे मिळणार, रशियात संशोधन : सुत्र
मुलांना कोरोना प्रतिबंधक लस नाकातील स्प्रेद्वारे मिळण्याची शक्यता आहे. रशियात या स्प्रेवर संशोधन झाले आहे.
कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधक लस हाच प्रभावी उपाय आहे. त्यामुळे आता जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु करण्यात आले आहे. आता वय वर्ष 8 ते 12 या वयोगटातील मुलांसाठी प्रतिबंधक लस सुरु करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाच्या कोरोना प्रतिबंधक लस विकसित करणाऱ्या स्पुटनिक व्ही कंपनीने आता नोसल स्प्रे (nasal spray) विकसित केलं आहे. हा स्प्रे लहान मुलांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
स्पुटनिक व्ही लस विकसित करणार्या गमलेया इन्स्टिट्यूटचे प्रमुख अलेक्झांडर जिंटसबर्ग म्हणाले की, मुलांची लस आणि वयस्क व्यक्तींना दिली जाणारी लस एकच आहे, फक्त “सुईऐवजी, नोजल स्प्रेतून दिली जाते”, अशी माहिती टीएएसएस वृत्तसंस्थेने दिली आहे.
15 सप्टेंबरपर्यंत मुलांच्या शॉट्स वितरणासाठी सज्ज होण्याची अपेक्षा आहे, असे अध्यक्ष जिंटसबर्ग यांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या बैठकीत सांगितले.
या संशोधन गटाने आठ ते 12 वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी केली त्यावेळी यात कोणतेही दुष्परिणाम दिसले नाही. यात शरिराचे तापमानही सामान्य होते, अशी माहिती जिंटसबर्ग यांनी TASS या वृत्तसंस्थेला दिलीय. "आम्ही आमच्या छोट्या रूग्णांना लस देण्यासाठी सज्ज आहोत. ही लस एकच असणार आहे फक्त ती नाकावाटे स्प्रे करण्यात येणार आहे, असे जिंटसबर्ग म्हणाले. मात्र, या संशोधनात किती मुले सहभागी होती याविषयी त्यांनी काहीही माहिती दिली नाही.