Russia Ukraine War : यूक्रेनचा व्लादिमीर पुतिन यांच्या हेलिकॉप्टरवर ड्रोन हल्ला, झेलेंस्की यांचा आदेश होता, रशियाचा सर्वात मोठा दावा
Russia Ukraine War : रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध तीन वर्षांपासून अधिक काळ सुरु आहे. सध्या युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. रशियानं यूक्रेनच्या राष्ट्रपतींवर मोठा आरोप केला आहे.

मॉस्को : रशियानं आज (25 मे 2025) यूक्रेननं आमच्या देशाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या हेलिकॉप्टरवर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप केला आहे. रशियाचा हा दावा आहे की या आठवड्यात कुर्स्कच्या दौऱ्यादरम्यान पुतिन यांचं हेलिकॉप्टर ड्रोन हल्ल्यामध्ये आलं होतं. मात्र, रशियाच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं राष्ट्रपती पुतिन यांची सुरक्षा निश्चित केली. पुतिन यांच्या हेलिकॉप्टरवर हल्ल्याचे आदेश वोलोदिमीर झेलेंस्की यांनी दिल्याचा आरोप रशियानं केला आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन कधी शस्त्रसंधीसाठी तयार होतात, तर कधी यूक्रेनवर जोरदार ड्रोन हल्ला करतात. रशियन सैन्यानं शनिवारी रात्री यूक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला दोन्ही देशांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या एकमेकांच्या नागरिकांची सुटका केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला आश्चर्यजनक मानला जातोय कारण पुतिन यांनी यापूर्वी मानवतेचा दाखल देत 2 वेळा शस्त्रसंधी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील इतर देश रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. शनिवारी झालेले ड्रोन हल्ले रशियानं यूक्रेनची राजधानी कीवसह इतर मोठ्या शहरांमध्ये केले. यूक्रेनच्या जहाजाला रशियाच्या मिसाईलनं ओडेशा पोर्टवर बुडवलं. त्यामध्ये शस्त्र असल्याचा दावा रशियाचा आहे.
कीवसह इतर ठिकाणांवर मिसाइल आणि ड्रोन हल्ले
रशियानं यूक्रेनची राजधानी असलेल्या कीवसह इतर ठिकाणांवर मिसाईल आणि ड्रोन हल्लेकेले. रशिया आणि यूक्रेनमध्ये बंदिवान असलेल्या नागरिकांची अदलाबदली करण्यात आली आहे. यूक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार रशियाच्या हवाई हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. अनेक जण जखमी देखील झाले आहेत.
पुतीन यांच्यावर शस्त्रसंधीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव वाढला आहे. या दरम्यान रशियानं यूक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि घातक हवाई हल्ला केला आहे.
दरम्यान, रशिया आणि यूक्रेन युद्ध 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु झालं होतं. ते युद्ध अद्याप थांबलेलं नाही. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध यूक्रेनच्या नाटोमधील सहभागाच्या मुद्द्यामुळं सुरु झालं होतं. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं दबाव वाढवत आहेत. यूक्रेन जर नाटोत सहभागी झालं तर नाटोच्या सदस्य देशांना रशियाच्या सीमांपर्यंत पोहोचणं सोपं होईल. यालाच पुतिन यांचा विरोध आहे.
























