Princess Diana: महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर प्रिन्सेस डायना ट्रेंड, जाणून घ्या कोण होत्या त्या...
Princess Diana: ब्रिटनच्या (Britain) महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. त्यांच्या निधनानंतर जगभरात शोककळा पसरली आहे.
![Princess Diana: महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर प्रिन्सेस डायना ट्रेंड, जाणून घ्या कोण होत्या त्या... Princess Diana Trends After Queen Elizabeth's Death, Know Who She Was… Princess Diana: महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर प्रिन्सेस डायना ट्रेंड, जाणून घ्या कोण होत्या त्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/eed322e5bfd24bb5efda38f3a3cd8f1e1662721517834384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Princess Diana: ब्रिटनच्या (Britain) महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. त्यांच्या निधनानंतर जगभरात शोककळा पसरली आहे. त्यांनी तब्बल 70 वर्ष ब्रिटनवर राज्य केलं. त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर प्रिन्सेस डायना ट्रेंड करत आहे. कोण होत्या प्रिन्सेस डायना? त्यांचं आणि महाराणी एलिझाबेथ यांचं नातं काय, याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
पार्क हाऊस, सँडरिंगहॅम, नॉरफॉक येथे 1 जुलै 1961 रोजी जन्मलेल्या प्रिन्सेस डायना या प्रिन्स चार्ल्स, प्रिन्स ऑफ वेल्स यांची पहिली पत्नी होती. सामान्य लोकांच्या राणी म्हणूनही त्यांना जगभरात ओळखलं जायचं. डायना यांचा 31 ऑगस्ट 1997 रोजी कार अपघातात मृत्यू झाला.
डायना या जेव्हा 9 वर्षाच्या होत्या तेव्हाच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. हा त्यांच्यासाठी एक मोठा धक्का होता. या घटनेनंतर त्यांचा असा समाज झाला की, आपण कधीही प्रेमात पडल्याशिवाय लग्न करणार नाही, अन्यथा आपल्यालाही याच प्रसंगाला सामोरं जावं लागेल, असं त्यांच्याबद्दल बोललं जातं. डायना या 16 वर्षांच्या असताना त्यांची पहिल्यांदा प्रिन्स चार्ल्स यांच्याशी भेट झाली. त्यावेळी प्रिन्स चार्ल्स हे डायना यांची बहीण सारा यांना डेट करत होते. चार्ल्स हे डायना यांच्यापेक्षा वयाने 13 वर्ष मोठे होते. पुढे डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या गाठीभेटी वाढल्या आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा शाही विवाहसोहळा सेंट पॉल कॅथेड्रल चर्च येथे पार पडला. त्यावेळी त्यांच्या विवाहसोहळ्याला 3,500 पाहुण्यांची उपस्थिती होती. तर लाखोंच्या संख्येने लोक हा विवाहसोहळ्या टेलिव्हीजनवर पाहत होते.
लग्नानंतर शाही पद्धतीने वागण्याचं आणि तसंच राहण्याचं त्यांच्यावर दडपण होत. तसेच प्रिन्स चार्ल्स यांचं बाहेर एका दुसऱ्या महिलेशी अफेअर सुरु होते. डायना यांना लग्नापूर्वीच याची माहिती होती. त्यांना चार्ल्स यांच्याशी लग्न करायचं नव्हतं, मात्र जगभरात त्यांच्या लग्नाची इतकी चर्चा झाली होती की, त्यांना आपल्या निर्णयापासून मागे सरता आलं नाही. लग्नाच्या 11 वर्षांनंतर दोघे वेगळे झाले. डिसेंबर 1992 मध्ये राणीने त्यांना वेगळे राहण्याची परवानगी दिली. पुढे 1996 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
याच दरम्यान, 1992 मध्ये एक पुस्तक प्रकाशित झालं, ज्याचं नाव आहे डायना: हर ट्रू स्टोरी. यात डायना यांचं तुटलेलं लग्न, चार्ल्स आणि कॅमिला यांचे अफेअर आणि डायना यांच्या आयुष्यातील नैराश्य या सर्व गोष्टी होत्या. आता पडद्यामागच्या गोष्टी पुस्तकाच्या रूपाने लोकांच्या हाती लागल्या होत्या. त्यामुळे राजघराण्याला मोठा पेच निर्माण झाला. स्वत: राणी एलिझाबेथ यांनी 1992 हे अत्यंत वाईट वर्ष असल्याचे सांगितले होते. प्रिन्स चार्ल्स यांनी लग्नानंतर कॅमिला पार्करला डेट करायला सुरु केल्याने राजघराण्यात तणाव निर्माण झाला होता. असे म्हटले जाते की, राणी एलिझाबेथ यांनी चार्ल्स यांना समजावून सांगितले. मात्र याचा काही उपयोग झाला नाही.
त्यांच्या घटस्फोटाच्या फक्त एक वर्षानंतर प्रिन्सेस डायना यांचा पॅरिसमध्ये रास्ता अपघातात मृत्यू झाला. तेव्हा त्या 36 वर्षाच्या होत्या. डायना या त्यावेळी त्यांचा मित्र डोडी अल फयेदसोबत होत्या. यानंतर चार्ल्स आणि कॅमिला 1999 पासून पुन्हा भेटू लागले. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी एप्रिल 2005 मध्ये लग्न केले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)