पाकिस्तानमध्ये आज मतदान, पुन्हा नवाज शरीफ सरकार स्थापन होण्याची शक्यता?
Pakistan General Election : आज सकाळी 8 वाजता मतदानाला सुरवात होणार असून, सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रकिया सुरु राहणार आहे.
Pakistan General Election : पाकिस्तानमध्ये (Pakistan) हिंसाचाराचे वातावरण असतानाच दुसरीकडे आज देशभरात सर्वत्रिक निवडणूक (General Election) होत आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) तुरुंगात असल्याने नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) आणि बिलावल भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात मुख्य लढत समजली जात आहे. या शर्यतीत नवाझ शरीफ आघाडीवर असून ते चौथ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांना लष्कराकडून मिळणारा मोठा पाठींबा मिळत असल्याची चर्चा आहे. आज सकाळी 8 वाजता मतदानाला सुरवात होणार असून, सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रकिया सुरु राहणार आहे.
पाकिस्तानमध्ये होत असलेल्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने देशभरात एकूण 90,7675 मतदान केंद्रे तयार केली आहेत. यामध्ये पुरुष मतदारांसाठी 25,320, महिलांसाठी 23,952 आणि इतरांसाठी 41,402 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 44 हजार मतदान केंद्रे सामान्य आहेत, तर 29,985 संवेदनशील भागात आहेत. तर, 16,766 अतिसंवेदनशील आहेत.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमा सील
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये देशभरात सुमारे 650,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या निवडणुकीत देशातील 12.85 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमा सील केल्या आहेत. मतदान अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली 90 हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर मतदान साहित्य पोहोचवण्यात आले. त्यामुळे आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे पाकिस्तानमधील नागरिकांसह जगाचे लक्ष लागले आहे.
एकूण 5121 हून अधिक उमेदवार आमनेसामने
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, लोकसभा निवडणुकीत एकूण 5121 हून अधिक उमेदवार आमनेसामने आहेत. यामध्ये 4807 पुरुष, 312 महिला आणि दोन ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे. तसेच, चार विधानसभांच्या निवडणुकीत एकूण 12,695 उमेदवार रिंगणात आहेत, ज्यात 12,123 पुरुष, 570 महिला आणि दोन ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे.
नवाझ शरीफ पुन्हा एकदा पंतप्रधान होणार?
पाकिस्तानमधील माध्यमांकडून पुन्हा एकदा पाकिस्तानची सत्ता नवाझ शरीफ यांच्या ताब्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणात शिक्षा झाल्याने नवाझ शरीफ यांना गेल्यावेळी निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना 10 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. असे असतांनाही पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये नवाझ शरीफ यांची सत्ता येण्याची शक्यता असून, ते पुन्हा एकदा पंतप्रधान होऊ शकतात.
निवडणुकीच्या पूर्वसंध्येला बॉम्बस्फोट
पाकिस्तानमध्ये आज मतदान होत असतानाच दुसरीकडे निवडणुकीच्या पूर्वसंध्येला बलुचिस्तान प्रांतात दोन बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे यात 25 लोकं ठार झाली असून, 40 जन गंभीर जखमी झाले आहेत. एका अपक्ष उमेदवाराच्या कार्यालयाबाहेर हा बॉम्बस्फोट झाला असल्याने यामागे निवडणुकीचे कारण असल्याचे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :