(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आधी बेधडक पत्रकार अन् आता काही महिन्यातच नेपाळच्या राजकारणाचा हिरो... रवि लामिछानेची जिगरबाज कहाणी
नेपाळमधील निवडणुकांमध्ये अवघ्या काही महिन्यांपूर्वी पक्ष स्थापन केलेल्या रवि लामिछाने यांनी दबदबा निर्माण केलाय. लामिछाने यांचा राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष हा निवडणुकीत चौथ्या स्थानी आला आहे.
Nepal General Elections 2022 : प्रस्थापित सत्तेच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या एका टीव्ही पत्रकारानं सध्या नेपाळच्या राजकारणात धुरळा केला आहे. नेपाळमधील संसदीय निवडणुकांमध्ये अवघ्या काही महिन्यांपूर्वी पक्ष स्थापन केलेल्या रवि लामिछाने यांनी दबदबा निर्माण केलाय. लामिछाने यांचा राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष हा निवडणुकीत चौथ्या स्थानी आला आहे.
लामिछाने हे नेपाळचे एक अतिशय प्रसिद्ध न्यूज चॅनलचे अॅंकर होते. ते पत्रकार असताना देखील धडाकेबाज मुलाखतींमुळं ते प्रसिद्ध होते. एप्रिल 2013 मध्ये जेव्हा त्यांनी सर्वात लांब टॉक शोसाठी विश्वविक्रम केला होता. तसेच राजकीय व्यक्ती आणि सरकारी अधिकाऱ्यांचे स्टिंग ऑपरेशन करून देशातील भ्रष्टाचार उघड करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता.
2022 मध्ये त्यांनी Galaxy 4 TV च्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. त्यानंतर मंगळवारी झालेल्या संसदीय निवडणुकांमध्ये त्यांनी आपला पक्ष जोमाने उतरवला होता. त्यांनी स्वत: चितवन मतदारसंघातून सत्ताधारी नेपाळी काँग्रेसच्या उमेदवार आणि केंद्रात मंत्री असलेल्या जुन्या नेत्याचा पराभव केला आहे.
अवघ्या पाच महिन्यांपूर्वी त्यांचा पक्ष स्थापन झाला आहे. त्यांच्या पक्षाचे सहा उमेदवार आतापर्यंत विजयी झाले असल्याची माहिती आहे. आणखी काही उमेदवार विजयाच्या मार्गावर आहेत. नेपाळमध्ये नॅशनल लिबरेशन पार्टी (NIP) ला संसदेत अधिक जागा मिळू शकतात असा अंदाज आहे.
एनआयपीच्या तिकिटावर निवडणूक जिंकणाऱ्यांमध्ये 27 वर्षीय वकील सोबिता गौतम यांचाही समावेश आहे. त्यांनी म्हटलं की, प्रस्थापित राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून सतत दुर्लक्ष केल्याने मतदार कंटाळले आहेत. या जनादेशावरून दिसून येते की तरुण पिढी आता गोष्टी स्वतःच्या हातात घेत आहे. देशातील युवक आणि संसद यांच्यातील सेतू म्हणून मी काम करेन, असं त्यांनी म्हटलं.
लामिछाने यांच्या एनआयपीने आपल्या निवडणूक प्रचारात महागाई तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. युवा राजनेता लामिछाने हे नेहमीच चर्चेत असतात. निवडणूक प्रचारादरम्यान 13 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. लामिछाने यांची पार्टी रिकॉल इलेक्शन आणि राइट टू रिजेक्शनचं समर्थन करते आणि नेपाळमध्ये हेच अधिकार लागू करण्यावर त्यांचा भर आहे.
नेपाळच्या राजकारणात सध्या युवा विरुद्ध बुजुर्ग असा संघर्ष पाहायला मिळतोय. नेपाळचे सध्याचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा 76 वर्षांचे आहेत. ते पाच वेळा पंतप्रधान झाले आहेत. यावेळी देखील त्यांनी विजय मिळवला आहे. तर अन्य दोन मोठ्या पक्षांचे नेते पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड आणि केपी शर्मा ओली हे देखील 65 वर्षांच्या वरील आहेत. ते दोघेही दोन वेळा पंतप्रधान राहिले आहेत.