Hafiz Abdul Salam Bhuttavi Death : दहशतवादी हाफिज भुट्टावीचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू; 26/11 च्या हल्लेखोरांना दिले होते प्रशिक्षण
Hafiz Abdul Salam Bhuttavi : पाकिस्तानातील मुरीदके येथे लष्कराचे मुख्यालय स्थापन करणारा भुट्टावी हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना जमात-उद-दावा (JuD) आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहायक होता.
Hafiz Abdul Salam Bhuttavi Death : मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या (Mumbai Terror Attack) मुख्य सूत्रधार हाफिज सईद याचा निकटवर्तीय हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी (Hafiz Abdul Salam Bhuttavi ) याचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झाला आहे. भुट्टावी यानेच अजमल कसाब (Ajamal Kasab) आणि इतर दहशतवाद्यांना प्रशिक्षित केले होते. संयुक्त राष्ट्र संघाने (UN) भुट्टावीच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
29 मे 2023 रोजी दहशतवादी हाफिज अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू झाला, परंतु संयुक्त राष्ट्रांनी आता अधिकृतपणे आपल्या वेबसाइटवर याची पुष्टी केली आहे. पंजाब प्रांतात पाकिस्तान सरकारच्या ताब्यात असताना त्याचा मृत्यू झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
पाकिस्तानातील मुरीदके येथे लष्कराचे मुख्यालय स्थापन करणारा भुट्टावी हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना जमात-उद-दावा (JuD) आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहायक होता. JuD ही लष्कर-ए-तैयबाची प्रमुख दहशतवादी संघटना आहे. भुट्टावीच्या मृत्यूनंतर, जमातशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले होते की, 77 वर्षीय भुट्टावी दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात ऑक्टोबर 2019 पासून लाहोरपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेखूपुरा जिल्हा कारागृहात कैद होता. 29 मे रोजी छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने भुट्टावीला रुग्णालयात नेण्यात आले.रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.
हाफिज सईदला ताब्यात घेण्यात आले तेव्हा भुट्टावीने किमान दोन वेळा लष्कर-ए-तैयबा/जमात-उद-दावा (LeT/JuD) चा प्रमुख म्हणून काम केले. नोव्हेंबर 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर काही दिवसांनी सईदला ताब्यात घेण्यात आले होते. जून 2009 पर्यंत त्याला कोठडीत ठेवण्यात आले होते. भुट्टावीने या काळात दहशतवादी संघटनेच्या दैनंदिन कारवाया हाताळल्या आणि संघटनेच्या वतीने निर्णय घेतले.
युनायटेड नेशन्सने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले की, भुट्टावीने नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवादी तयार करण्यात मदत केली. मुंबई हल्ल्यात 150 हून अधिक लोक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले. LeT/JuD च्या मदरसा नेटवर्कसाठी भुट्टावी जबाबदार असल्याचे मानले जाते. त्याच वेळी, 2002 च्या मध्यात, भुतावी पाकिस्तानातील लाहोरमध्ये लष्कर-ए-तैयबा या संघटनेची स्थापना करण्याचाही प्रभारी होता.