सायकलस्वाराला ओव्हरटेक करणं लॅण्ड रोव्हर चालकाला महागात, 99 हजार रुपयांचा दंड
ब्रिटनमध्ये एका सायकलस्वाराला ओव्हरटेक केल्याबद्दल लॅण्ड रोव्हरच्या मालकाला सुमारे 99 हजार रुपयांचा दंड भरावा लागला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
Viral Video : भारतात भलेही लोक वाहतुकीच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करतात, इतकंच काय पोलीस देखील महागड्या गाड्यांवर कारवाई करण्याचं टाळतात. पण ब्रिटनमध्ये वाहतुकीचे नियम फारच कठोर आहेत. इथे नियम किती काटेकोरपणे पाळले जातात, याचा अंदाज यावरुन लावता येतो की, सायकलस्वाराला ओव्हरटेक केल्याबद्दल लॅण्ड रोव्हरच्या मालकाला सुमारे 99 हजार रुपयांचा दंड भरावा लागला.
काय आहे प्रकरण?
52 वर्षीय पॉल निगेल मायली हे लॅण्ड रोव्हर कारचे मालक आहे. संबंधित घटना घडली त्यावेळी ते कुठेतरी जात होते. यादरम्यान त्यांनी कंट्री लेनमधून जाणाऱ्या सायकलस्वारांच्या गटाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यामुळे एका सायकलस्वाराचे नियंत्रण सुटलं आणि तो दरीच्या दिशेने पडू लागला. त्याने कसंतरी स्वत: ला सावरलं, पण पडल्यामुळे त्याला थोड्या जखमाही झाल्या. ही संपूर्ण घटना सायकलस्वाराच्या हेल्मेटला लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली.
व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस सक्रिय
यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला. यानंतर हे फुटेज नॉर्थम्प्टनशायर पोलिसांच्या ऑपरेशन स्नॅपपर्यंत पोहोचलं. पोलिसांनी तपास सुरु केला असता ही घटना 11 जून 2021 ची असल्याचं समजलं. यानंतर आरोपींची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. पोलिसांनी तातडीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आणि कारचालकाची ओळख पटवण्यासाठी सर्वसामान्यांची मदत घेतली. आरोपीची ओळख पटताच नॉर्थम्प्टनशायरच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने या व्यक्तीला निष्काळजीपणे गाडी चालवल्याच्या आरोपावरुन 1 हजार पौंड म्हणजेच सुमारे 99 हजार 270 रुपये दंड ठोठावला.
कारवाईवरुन दोन मतं, काही जणांकडून चालकाचा बचाव
मात्र, या कारवाईबाबत सोशल मीडियावर दोन मतं आहेत. एकीकडे ही कारवाई बरोबर सांगत असतानाच दुसरीकडे काही जण लॅण्ड रोव्हरच्या मालकाच्या बचावासाठी उतरले. फुटेज पाहून लोकांनी पोलिसांना सल्ला दिला की, "लॅण्ड रोव्हर चालवणाऱ्या व्यक्तीने सायकलस्वारासाठी बरीच जागा सोडली होती. यानंतरही अपघात झाला तर त्याला कार चालक जबाबदार नसतो. त्यामुळे केवळ एकतर्फी कारवाई करणे योग्य नाही."