तुर्कीची राजधानी इस्तांबुलमध्ये भीषण स्फोट; एकाला अटक, तर 6 लोकांचा मृत्यू, 81 जखमी
Istanbul Explosion: अल जझीरानं आपल्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्यानं दावा केला होता की, हल्लेखोरांमध्ये तीन लोकांचा समावेश आहे, त्यापैकी एक महिला आणि दोन तरुण आहेत.
Istanbul Explosion: तुर्कीतील (Turkkey) इस्तंबुल (Istanbul) काल (रविवारी) बॉम्बस्फोटांनं हादरलं. या स्फोटात अनेकजण जखमी झाले आहेत. अशातच तुर्कीच्या इस्तंबुलमध्ये मोठ्या आत्मघातकी हल्ल्यात सहभागी असलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्याद्वारे संचालित अनादोलु एजन्सीच्या इंग्रजी भाषेतील ट्विटर अकाउंटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी सोमवारी (14 नोव्हेंबर) रोजी सांगितलं की, इस्तंबूलमध्ये स्फोट घडवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे, रविवारी (13 नोव्हेंबर) संध्याकाळी इस्तंबूलच्या मध्यभागी एका वर्दळीच्या भागात मोठा स्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला असून 81 जण जखमी झाले आहेत.
हल्ल्यानंतर अल जझिरानं सूत्रांचा हवाला देत दावा केला आहे की, या हल्ल्यात तीन लोक सामील होते, त्यापैकी एक महिला आणि दोन तरुणांचा समावेश आहे. हल्ल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळण्यात आलं. यामध्ये एक संशयित महिला स्फोटाच्या ठिकाणी रस्त्यावर बॅग टाकून बाहेर येताना दिसली. त्यानंतर काही मिनिटांतच मोठा स्फोट झाला. त्यानंतर महिलेनं ठेवलेल्या बॅगेतच बॉम्ब असल्याचं स्पष्ट झालं. त्या दृष्टीने पोलिसांनीही तपास सुरू केला असून ती महिला कोण होती याचा शोध सुरू केला आहे.
वर्दळी असलेल्या ठिकाणी स्फोटाच्या घटनेनंतर या सर्व परिसरात पोलिसांनी नाकेबंदी केली. तसेच या परिसरातल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करण्यात आली. या स्फोटामागे नेमका हात कोणाचा? याची चाचपणी अद्याप सुरु आहे. या स्फोटानंतर सर्व शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
इस्तंबुलमधील स्फोटामागे दहशतवादी संघटनांचा हात?
तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान (Recep Tayyip Erdogan) यांनी या स्फोटामागे दहशतवादी संघटनांचा हात असल्याची शक्यता वर्तवली आहे. या स्फोटामागे जे कोणी असतील त्यांना शोधलं जाईल आणि त्यांना शिक्षा दिली जाईल असं ते म्हणाले. या स्फोटानंतर तपास यंत्रणांना आदेश देण्यात आले असून लवकरच हल्लेखोरांना आम्ही पकडू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी तुर्कीमध्ये 2015 आणि 2017 साली दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता. त्या स्फोटांमागे इस्लामिक स्टेटचा हात असल्याचं नंतर समोर आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :