(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Israel-Palestine conflict live: गाझापट्टीवर बाॅम्बवर्षाव, हमासनंतर आता हिजबुल्लाहने सुद्धा उत्तर इस्त्रायलवर मोर्टार डागले; इस्त्रायलकडून प्रत्युत्तर
Israel-Palestine conflict : हमास आणि इस्त्रायलमध्ये घनघोर संघर्ष सुरु असतानाच आता उत्तरी इस्त्रायलमध्ये डोकेदुखी वाढली आहे. हमासप्रमाणेच लेबनाॅनमधील संघटना असलेल्या हेजबोल्लाहने मोर्टार डागले आहेत.
गाझापट्टी (पॅलेस्टाईन) : अंतर्गत यादवीने गेल्या वर्षभरापासून अनेक आघाड्यांवर हैराण असलेल्या इस्त्रायलला अत्यंत बेसावधपणे हमासने घुसून टार्गेट केल्यानंतर रक्ताचा पाट वाहू लागला आहे. इस्त्रायलने अत्यंत कडक प्रत्युत्तर देताना गाझापट्टीवर बाॅम्बचा पाऊस पडला आहे. हमास आणि इस्त्रायलमध्ये घनघोर संघर्ष सुरु असतानाच आता उत्तरी इस्त्रायलमध्ये डोकेदुखी वाढली आहे. हमासप्रमाणेच लेबनाॅनमधील संघटना असलेल्या हेजबोल्लाहने मोर्टार डागले आहेत. उत्तरी इस्त्रायलमध्ये झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी सुद्धा घेतली आहे.
इस्त्रायलकडून जोरदार प्रत्युत्तर
लेबनॉनमधून व्याप्त शेबा फार्म्सवर मोर्टार हल्ल्यांची जबाबदारी हिजबुल्लाहने घेतली आहे. इस्रायलने सुद्धा तोफा डागत हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी हमासच्या हल्ल्यानंतर वेढा घातलेल्या पॅलेस्टिनी एन्क्लेव्हला “निर्जन बेट”मध्ये बदलण्याची धमकी दिल्यानंतर गाझावरील जमिनीवर आक्रमणाची भीती वाढत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या दोन्हीकडील हल्ल्यात मोठी जिवितहानी झाली आहे. आतापर्यंत 313 पॅलेस्टिनी मृत्यूमुखी पडले आहेत. दुसरीकडे सुमारे 300 इस्रायलींनी आपला प्राण गमावला आहे.
हमासकडून इस्त्रायलींचे अपहरण?
दरम्यान, गाफील असलेल्या इस्त्रायलला खिंडीत पकडून वार केल्यानंतर शेकडो नागरिकांचे अपहरण करून गाझापट्टीत नेल्याचे बोलले जात आहे. अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार हमास आज सायंकाळपर्यंत त्यांच्या ताब्यात कितीजण आहेत याबाबत आकडा देण्याची शक्यता आहे. हमासने अनेक इस्रायलींनाही पकडून त्यांना गाझापट्टीच्या सर्व भागात ओलीस ठेवले आहे. इस्रायली स्थायिकांच्या मोठ्या प्रमाणावर हल्ले, व्याप्त पूर्व जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीच्या कंपाऊंडमध्ये वाढलेला तणाव आणि विक्रमी संख्येने पॅलेस्टिनी मारले गेल्याच्या पार्श्वभूमीवर हमासची कारवाई झाली. जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीच्या कंपाऊंडमध्ये वाढलेला तणाव आणि विक्रमी संख्येने पॅलेस्टिनी मारले गेल्याच्या पार्श्वभूमीवर हमासने इस्त्रायलवर हल्ला केला आहे.
इस्रायली सरकारने हमासच्या हल्ल्यानंतर आणीबाणीची स्थिती जाहीर केली आणि लष्करी कारवाईला सुरुवात केली. इस्त्रायलने युद्ध असल्याची घोषणा केली. दुसरीकडे, हमासने इस्रायलविरुद्धच्या त्यांच्या ऑपरेशनला 'अल-अक्सा स्टॉर्म' (Al-Aqsa Storm) असे नाव दिले आणि इस्रायलने प्रत्युत्तरातील कारवाईला 'स्वॉर्ड्स ऑफ आयर्न' (Swords of Iron) नाव दिलं आहे. गाझा पट्टीतून पॅलेस्टिनी गटाने सुरू केलेल्या हवाई, सागरी आणि जमिनीवरील ऑपरेशन्सचा समावेश असलेल्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि हमास आणखी एका संघर्षाच्या उंबरठ्यावर आहेत.