Iran-Israel War: कोणत्या भीतीने अमेरिकेने दोन देशामध्ये पडून केला हल्ला? इराण असं काय करत होतं?
Iran-Israel War: अमेरिका-इराण यांच्यात तणाव वाढल्याने इतर देशांची चिंता वाढली आहे, यात अनेक देश ओढले जाण्याची भीती वर्तवली जात आहे.

Iran-Israel War: अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर हल्ले केल्यानंतर संतापलेल्या इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी अमेरिकेला धमकी देत थेट आव्हान दिले आहे. 'खेळ अजून संपलेला नाही, आता अमेरिका पूर्वीपेक्षा भयंकर हल्ले आणि विनाश पाहील', असे खामेनेई यांनी म्हटले आहे. इराणच्या या धमकीला न जुमानता अमेरिकेनेही अशा कारवाईला तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर देण्यात येईल असं म्हटलं आहे. यामुळे आता थेट अमेरिका-इराण यांच्यातच तणाव वाढल्याने इतर देशांची चिंता वाढली आहे, यात अनेक देश ओढले जाण्याची भीती वर्तवली जात आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांचे स्वागत केले आहे. इराणच्या आण्विक केंद्रांवर अमेरिकेने केलेले हल्ले या भागाचा इतिहास बदलू टाकतील, असंही त्यांनी म्हटलं आहे आहे. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फोनद्वारे बेंझामिन नेतान्याहू यांच्याशी संवाद साधला आहे. तर इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर अमेरिकेने केलेला हल्ला हा बेजबाबदारपणाचे लक्षण असल्याचे सांगत रशियासह पाकने याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेनुसार निश्चित केलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्याचा हा भंग आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा सदस्य असलेल्या एका देशाने हे हल्ले केल्याने ही अधिक चिंताजनक बाब असल्याचे रशियाने म्हटले आहे. काही देशांनी अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा निषेध नोंदवला आहे तर काही देशांनी पाठिंबा दिला आहे.
कोणत्या गोष्टीच्या भीतीने अमेरिकेने केला हल्ला?
इराण अण्वस्त्रे निर्माण करू शकतो, याची भीती इस्रायलला आहे. त्याचबरोबर, दुसरीकडे इराणने समृद्ध युरेनियम मिळवण्याच्या दृष्टीने तीन आण्विक केंद्रांत तयारी चालू केली असल्याचा अमेरिकेचा अंदाज होता. अमेरिकेने हल्ला केलेल्या या तिन्ही केंद्रांवर हल्ल्यानंतर कोणताही किरणोत्सर्ग झालेला नाही. शिवाय अमेरिकी गुप्तचर संस्थांनीही इराण अजून अणुबॉम्ब तयार करण्यात सक्रिय झालेला नाही. मात्र, भविष्यात इराण तो निर्माण करू शकतो, असा अहवाल दिलेला आहे. यामुळे इराणकडे अणुबॉम्ब आहे की नाही, याबाबतच शंका निर्माण झालेली आहे.
अमेरिकेचा हल्ला बेजबाबदार - रशिया
अमेरिकेच्या इराणवरील आण्विक तळांवर हल्ल्याचा रशियाने तीव्र निषेध केला आणि तो बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. रशियाने म्हटले की, हे आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रांचे सनद आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे घोर उल्लंघन आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "एका सार्वभौम देशावर क्षेपणास्त्रे आणि बॉम्बने हल्ला करण्याचा निर्णय बेजबाबदार आहे, त्यासाठी कोणतेही कारण दिले जात असले तरी."
आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन - चीन
चीनने संपूर्ण घटनेचा निषेध केला आणि म्हटले की अमेरिकेची ही कृती संयुक्त राष्ट्रांच्या सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उद्दिष्टांचे आणि तत्त्वांचे गंभीर उल्लंघन आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "यामुळे मध्य पूर्व क्षेत्रात तणाव वाढला आहे." चीनने इस्रायलला तात्काळ युद्धबंदी जाहीर करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाटाघाटी सुरू कराव्यात असे आवाहन केले. चीन न्यायाचे रक्षण करण्यासाठी आणि मध्य पूर्व प्रदेशात शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासोबत एकजुटीने उभे राहील, असंही म्हटलं आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मुस्लिम देशांची प्रतिक्रिया
इराणच्या आण्विक तळांवर अमेरिकेच्या हल्ल्याबद्दल सौदी अरेबियाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर पोस्ट केली आणि लिहिले की, आम्ही मध्य पूर्वेतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त करत म्हटले आहे की, "या प्रदेशातील सध्याच्या धोकादायक तणावाचे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विनाशकारी परिणाम होऊ शकतात." ओमानने इराणमध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांचा निषेध केला आणि ते आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे थेट उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. ओमानने सर्व पक्षांना परिस्थिती शांत करण्याचे आवाहन केले आहे.
ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानने काय म्हटले?
पाकिस्तानने अमेरिकेच्या इराणच्या आण्विक तळांवर हल्ल्यांचा निषेध केला आणि ते आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले. पाकिस्तानने या प्रदेशात हिंसाचार आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली आहे. याच्या एक दिवस आधी, पाकिस्तानने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी पाठिंबा दिला होता. पाकिस्तानने म्हटले आहे की, हे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सर्व नियमांचे उल्लंघन आहेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार इराणला स्वतःचा बचाव करण्याचा कायदेशीर अधिकार आहे.


















