International Mountain Day: जगभरातील 15 टक्के लोकसंख्या ही पर्वतीय प्रदेशात राहते. तसेच हा प्रदेश विविध प्राणी आणि निसर्गसंपदेनं संपन्न आहे. केवळ यासाठीच या प्रदेशाचं जतन करणं आवश्यक नाही तर इतर भागातील लोकसंख्येसाठीही पर्वतीय प्रदेश महत्वाचा आहे. त्यामुळे पर्वतांच्या संवर्धनासाठी आणि त्याच्या विषयी जागरुकता वाढवण्यासाठी 11 डिसेंबर हा दिवस 'आतंरराष्ट्रीय पर्वत दिवस' म्हणून साजरा केला जातो.
'पर्वतीय जैवविविधता' या वर्षीची थीम
या वर्षी पर्वत दिवस साजरा करताना संयुक्त राष्ट्रसंघटनेनं 'पर्वतीय जैवविविधता' अशी थीम तयार केली आहे. पर्वतीय प्रदेशातील संपन्न जैवविविधता, त्याच्या समोरील आव्हानं आणि त्याचं संवर्धन यावर जागरुकता वाढवण्यासाठी जगातील राष्ट्रांनी प्रयत्न करावेत असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघटनेनं केलं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघटनेमध्ये 1992 साली 'अजेंडा 21' या 21 व्या शतकातील जैवविविधतेचे संवर्धनासंबंधी महत्वपूर्ण आराखड्याला मंजुरी देण्याता आली. त्यामध्ये 13 वा मुद्दा हा "Managing Fragile Ecosystems: Sustainable Mountain Development" होता. यामध्ये पर्वतीय जैवविविधतेच्या शाश्वत विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं. पर्वतांचं पर्यावरणातील महत्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघटनेनं 2002 साल हे 'आंतरराष्ट्रीय पर्वत वर्ष' या स्वरुपात साजरं केलं आणि 11 डिसेंबर 2003 पासून 'आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेतला.
मानवी जीवनात पर्वतांचे महत्व
पर्यावरणावर आणि लोकांच्या जीवनावर पर्वतांचा प्रभाव मोठा असतो. या प्रदेशाची एक वेगळी निसर्गसंपदा आणि जैवविविधता असते. निसर्गाच्या जलचक्रामध्ये पर्वत महत्वाची भूमिका बजावतात. उन्हाळ्याच्या काळात पर्वतीय बर्फ वितळतो आणि परिणामी पर्वतीय नद्या बारमाही वाहतात. कृषी आणि लोकाना आवश्यक पाण्याचा पुरवठा त्यामुळे शक्य होतो. भारतातील गंगा, यमुना सहित महत्वाच्या नद्यांचा उगम हिमालयाच्या पर्वत रांगात आहे. त्यामुळे भारतातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्येला त्याचा फायदा होतोय. जगातील प्रमुख नद्यांचा उगमही पर्वतीय प्रदेशात झाला आहे.
पर्वतांमधून येणाऱ्या पाण्यापासून हायड्रोइलेक्ट्रीक प्रोजेक्ट उभारुन त्यापासून वीजनिर्मिती केली जाते. विकसनशील देशांमध्ये पर्वतीय प्रदेश इंधनाचा प्रमुख स्तोत आहे. तसेच पर्वतीय प्रदेशांतील झाडांचे लाकूड हे घरबांधणीसाठी वापरलं जातं.
वातावरणातील बदल, चुकीच्या पध्दतीनं केली जाणारी शेती, या प्रदेशातील खणीकाम यामुळे पर्वतीय जैवविविधतेला धोका वाढत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Human Rights Day 2020: आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस; का साजरा केला जातो?
- Indian Armed Forces Flag Day 2020 | भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन का साजरा केला जातो?
- World Soil Day 2020 | आपल्यासाठी का महत्वाचा आहे जागतिक मृदा दिवस?
- International Volunteers Day 2020 | आज आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस, का साजरा केला जातो हा दिवस?