Human Rights Day 2020: जगभरातील नागरिकांच्या मानवाधिकारांप्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी 1950 सालापासून 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येईल असं संयुक्त राष्ट्रसंघटनेनं स्पष्ट केलं होतं. या दिवसासाठी 10 डिसेंबर हीच तारीख निवडण्यामागचं कारण म्हणजे 1948 साली याच दिवशी जगभरातल्या नागरिकांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेनं एक घोषणा पत्र जाहीर केलं होतं. हे घोषणा पत्र जगभरातल्या 500 पेक्षा जास्त भाषांत अनुवादीत आहे.
या वर्षीची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसाची थीम 'Recover Better, Stand Up For Human Rights' ही आहे. ही थीम कोरोनाशी संबंधित आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अॅंटोनिया गुटेरस यांनी आपल्या एका संदेशात सांगितलं आहे की, "कोरोनाशी लढा देताना तसेच लैंगिक समानता, वातावरण बदल आणि शाश्वत विकासांच्या मुद्द्यात मानवाधिकारांना केंद्रस्थानी ठेवण्याची आवश्यकता आहे."
मानवाधिकार हा जगभरातील प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. कोणत्याही जात, धर्म, पंथ, लिंग, राष्ट्र, प्रांत इत्यांदींच्या आधारे कोणालाही मानवी अधिकार नाकारता येणार नाहीत असं संयुक्त राष्ट्रानं स्पष्ट केलंय. जगातला प्रत्येक मनुष्य स्वतंत्रता, समानता आणि सन्मानाचा हक्कदार आहे असंही सागितलं आहे.
मानवाधिकांरांच्या घोषणा पत्रात असं म्हटलंय की कोणात्याही मनुष्याला गुलामीत ठेवता येणार नाही, कोणालाही शारीरिक यातना देता येणार नाही. कोणाप्रती निर्दयता किंवा अमानवीय आणि अपमानजनक व्यवहार करता येणार नाही. जगातल्या प्रत्येकाला कायदेशीररित्या मानवी हक्काचा अधिकार आहे.
प्रामुख्याने स्त्रिया आणि बालकांच्या मानवी हक्काचं उल्लंघन
युध्दकाळात वा संघर्षाच्या काळात प्रामुख्यानं मानवी हक्कांचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन करण्यात येतं. त्यात स्त्रिया आणि बालकांचा बळी जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. तसेच जगभरात अनेक अविकसित राष्ट्रात आणि यादवी माजलेल्या राष्ट्रात मानवी हक्कांचं उल्लंघन मोठ्या प्रमाणात केलं जातंय.