United Nations Volunteers: जगभर 5 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस म्हणून साजरा केला जातो. सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थाच्या कार्याचा गौरव त्यानिमित्तानं करण्यात येतो. जगभर आपत्कालीन परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्था काम करत असतात. या वर्षी कोरोनाच्या काळात स्वयंसेवकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.


कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक स्वयंसेवकांनी पिडितांची मदत केली. जागतिक आरोग्य संघटनेने याची दखल घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केलं आहे.


1985 पासून साजरा केला जातो
संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या आमसभेने 17 डिसेंबर 1985 साली दरवर्षी 5 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस साजरा करण्यात येईल अशी घोषणा केली. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील विविध कार्यात लोकांनी आपलं योगदान द्यावं यासाठी जागरुकता केली जाते. जगभरात त्यानिमित्ताने परेड, रॅलीचे आयोजन केलं जातं. स्वयंसेवकांच्या विशेष योगदानाची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. त्यांच्यासाठी विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केलं जातं.


संयुक्त राष्ट्र वॉलंटीअर्सने स्वयंसेवकांच्या कार्याचे महत्व लक्षात घेऊन "Together We Can Through Volunteering." या थीमसह या वर्षीचा आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस साजरा करण्याचं ठरवलं आहे. संयुक्त राष्ट्र वॉलंटीअर्स कार्यक्रम जगभरात आपल्या स्वैच्छिक कार्याच्या माध्यमातून शांती आणि विकास प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. जगातील 130 देशात संयुक्त राष्ट्र वॉलंटीअर्स हा कार्यक्रम सुरु आहे.


संयुक्त राष्ट्र वॉलंटीअर्स कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या स्वयंसेवकांत 29 टक्के स्वयंसेवक हे 29 वर्षाच्या आतील आहेत आणि एकूण स्वयंसेवकांपैकी 51 टक्के या महिला आहेत.


भारतात 1999 पासून सुरुवात
भारतात संयुक्त राष्ट्र वॉलंटीअर्स या कार्यक्रमाची सुरुवात 1999 सालापासून झाली. त्याचं मुख्यालय नवी दिल्लीत आहे. युवा आणि महिला सशक्तीकरण, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ, अपंगत्व, बाल संरक्षण, शिक्षण, वातावरण बदल, पर्यावरण, सुशासन या क्षेत्रात संयुक्त राष्ट्र वॉलंटिअर्स कार्यक्रम राबवला जातो.


ब्लू हर्ट लोगो
या वर्षीच्या कार्यक्रमासाठी ब्ल्यू हर्ट लोगोचा वापर करण्यात येतोय. त्यामधून एक सकारात्मक भावनेचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे तसेच स्वयंसेवकांच्या कामाप्रती करुणा आणि दया व्यक्त केली आहे.