ओटावा: कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने Pfizer-BioNtech च्या लसीच्या वापराला मंजुरी दिली आहे. कॅनडाने दोन कोटी कोरोना लसींची मागणी केली आहे. त्याचा पुरवठा झाल्यानंतर लगेचच कॅनडात लसीकरण सुरु होणार आहे. ब्रिटन आणि बहरीन नंतर अशी मान्यता देणारा कॅनडा आता जगातील तिसरा देश ठरला आहे.


कॅनडामध्ये सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार असल्याचं कॅनडाच्या प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आजारी आणि वयोवृध्द नागरिकांना ही लस देण्यात येईल. मागणी केलेल्या प्रमाणात डोस उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला दोन डोस अशा प्रमाणात लस देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या लसींच्या साठवणुकीसाठी अत्यावश्यक शीतगृहांची निर्मिती करण्यात आल्याचीही प्रशासनानं सांगितलं आहे.


ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरुवात
ब्रिटनने याआधीच Pfizer-BioNtech कंपनीच्या लसीच्या वापराला मंजुरी दिली असून मंगळवारपासून त्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या लसीकरणाची सुरुवात उत्तर आयरलॅंडमधील एका 90 वर्षीय महिलेला लस देऊन करण्यात आली आहे. ही महिला फायझर/बायोएनटेक कोविड लस घेणारी जगातली पहिली महिला ठरली आहे. मार्गरेट कीनन असं त्या महिलेचं नाव आहे.


ब्रिटनमध्ये मंजुरी मिळालेली लस ही 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं जातंय. या लसीचा वापर सर्वप्रथम उच्च प्राथमिकता असलेल्या लोकांवर आणि रुग्णांवर केला जाणार असल्याचं ब्रिटनच्या प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. ब्रिटनने आपल्या 2 कोटी लोकसंख्येसाठी प्रत्येकी दोन डोस असे 4 कोटी डोसची ऑर्डर केली आहे.


महत्वाच्या बातम्या: