Indonesia New Capital : इंडोनेशियाने राजधानी बदलली, जकार्ता ऐवजी नुसंतारा आता नवी राजधानी
Indonesia New Capital : इंडोनेशियाने त्यांच्या नव्या राजधानीची घोषणा केली आहे. आता जर्काता ऐवजी नुसंतारा ही इंडोनेशियाची नवी राजधानी असणार आहे.
Indonesia New Capital : इंडोनेशिया आपली राजधानी लवकरच बदलणार आहे. आता जर्काता ऐवजी नुसंतारा ही इंडोनेशियाची नवी राजधानी असणार आहे. राजधानी बदलण्यासंदर्भातील बिलाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली आहे. नव्या राजधानीच्या विकासासाठी 33 अरब डॉलर खर्च करण्यात येणार असल्याचं तेथील सरकारकडून सांगण्यात आले आहे. नवी राजधानी नुसंतारा ईस्ट कालीमंतन परिसरात असणार आहे. हा परिसर बोर्निया द्वीप समूहाचा भाग आहे. इंडोनेशियाताल केंद्र सरकारचे सर्व मंत्रालय आणि परदेशी दूतावास येथे हलवण्यात येणार आहे. ही नवी राजधानी कधी तयार होणार? या विषयी अजून चित्र स्पष्ट झालेल नाही. परंतु याचे बांधकाम 2024 च्या पहिल्या तिमाहीत होण्याची शक्यता आहे.
इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यानी 2019 साली राजधानीचे स्थलांतर करण्यासंदर्भातील बिल संसदेत मांडले होते. यावर विचार करण्यासाठी एक स्पेशल कमिटीची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर हे बील तीन वर्षानंतर संसदेत मंजूर झाले आहे. नव्या राजधानीच्या अॅडमिनिस्ट्रेशनची जबाबजारी ही स्टेट कॅपिटल ऑथेरिटी चीफकडे असणार आहे. तसे पाहिले गेले तर बोर्नियो हा एक मोठा द्वीप आहे. नुसंतरा 2 लाख 56 हजार 142 हेक्टरमध्ये बांधण्यात येणार आहे.
किती खर्च होणार?
- नवी राजधानी ही वर्ल्ड सिटी व्हिजन समोर ठेवून बनवण्यात येणार आहे. जसे की दुबई, सिंगापूर
- संसदेत मंजुर केलेल्या बिलामध्ये खर्चाचा उल्लेख नाही
- अंदाजे 33 अरब डॉलर खर्च होण्याची शक्यता आहे. हा खर्च सरकारी तिजोरीतून होणार आहे
- सर्व सरकारी कार्यालये, दूतावास नुसंतारा येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे.
राजधानी बदलण्याची गरज का?
- जकार्ताची लोकसंख्या जवळपास 1 कोटीपेक्षा अधिक आहे
- जकार्ता जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या शहरापैकी एक आहे
- वाहतुकीच्या समस्येमुळे मंत्री, कर्मचारी वेळेत कार्यालयात पोहचत नाही
- गेल्या 15 वर्षापासून राजधानी बदलण्याची मागणी करण्यात येत आहे
- राष्ट्रपती विडोडो यांच्या मते व्यापारासाठी ही योग्य जागा नाही
- 1949 साली स्वातंत्र्यानंतर जकार्ताला इंडोनेशिनयाची राजधानी म्हणून घोषीत करण्यात आले
नुसंतरा हे नाव का पडले?
इंडोनेशिया अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर सुरारसो मोनोरफा यांच्या मते इंडोनेशियाई भाषेत नुसंतरा म्हणजे अशी जागा ज्या जागेला पाण्याने चहुबाजूने वेढले आहे. 80 नाावांपैकी हे नाव निश्चित करण्यात आले आहे.
या अगोदर कोणत्या देशांनी आपल्या राजधानी बदलल्या?
- ब्राझिलची राजधानी रियो डि जेनेरियो होती. आता ब्रासीलिया आहे
- नायजेरियाची राजधानी लागोस होती. आता अबुजा आहे
- कझाकिस्तानची राजधानी अलमाती होती. आता नूर- सुल्तान आहे
- म्यानमारची राजधामी रंगून होती. आता नेपीदा आहे.
नुसंतारा हा बोर्नियो द्वीपच्या कालीमंतनचा एक भाग आहे. बोर्निया द्वीप हा निसर्गाचे अमाप वरदान लाभलेला परिसर आहे. या परिसरात दाट जंगल आणि लहान नद्यांनी वेढलेला आहे. द गार्डियन च्या मते जेव्हा राजधानीच्या बांधकामाचे काम सुरू होईल तेव्हा येथील जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा सरळ परिणाम जंगलावर होणार आहे. पावसाचे प्रमाण त कमी होणारच परंतु प्राण्यांचा अधिवास देखील नष्ट होण्याची शक्यता आहे. या परिसरात अस्वल आणि मोठ्या नाकाचे माकड पाहायला मिळते. त्यांच्या अधिवासात प्रवेश केल्यास हे प्राणी अधिक हिंसक बनण्याची शक्यता आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha