(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विमानसेवा बंद होण्यापूर्वी अफगाणिस्तानातून परत या, भारतीय दूतावासाकडून नागरिकांना सल्ला
अफगाणिस्तानमध्ये सध्या परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर भारत येण्याचा सल्ला भारतीय दूतावासाने दिला आहे.
अफगाणिस्तानची परिस्थिती बिकट होत चालली आहे. तेथील अनेक प्रांतांची राजधानी आता तालिबानी सैन्याने बात्यात घेतली आहे. त्यामुळे तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर भारतात येण्याचा सल्ला भारतीय दूतावासाने दिला आहे. दरम्यान, तेथे राहणाऱ्या भारतीयांसाठी तिसऱ्यांदा मंगळवारी सुरक्षा अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. काबूलमधील भारतीय दूतावासाच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून असे म्हटले आहे की ही अॅडव्हायजरी 29 जून आणि 24 जुलै रोजी नुकत्याच जारी केलेल्या दोन सुरक्षा अॅडव्हायजरींशी संबंधित आहे.
यात म्हटले आहे की, मागील दोन अॅडव्हायजरीमध्ये दिलेले दोन सल्ले अजूनही वैध आहेत आणि सर्व भारतीयांना त्या दोन सुरक्षा संबंधीत दिलेल्या सूचनांचा पालन करण्यास सांगितले आहे.
Security Advisory for Indian Nationals in Afghanistan@MEAIndia pic.twitter.com/yB13DRpkgT
— India in Afghanistan (@IndianEmbKabul) August 10, 2021
यात पुढे म्हटले आहे की, अफगाणिस्तानच्या अनेक भागात प्रचंड हिंसाचार पाहता अनेक प्रांत आणि शहरांमध्ये व्यावसायिक उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. अफगाणिस्तानमध्ये भेट देणाऱ्या, काम करणाऱ्या आणि राहणाऱ्या सर्व भारतीयांना सल्ला देण्यात आला आहे की जेथे ते आहेत तेथून व्यावसायिक उड्डाणे घेण्यापूर्वी आणि त्यापूर्वी निघणाऱ्या व्यावसायिक उड्डाणांविषयी स्वतःला अपडेट ठेवा. विमानसेवा बंद होणार असतील तर त्वरित परत येण्याची तयारी करावी.
अफगाणिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांना त्यांच्या भारतीय कर्मचाऱ्यांना हवाई सेवा बंद करण्यापूर्वी अफगाणिस्तानमधील प्रकल्प स्थळांमधून बाहेर काढण्याचा सल्ला दिला गेला आहे. त्याचबरोबर, अफगाणिस्तान किंवा परदेशी कंपन्यांसाठी काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना सूचना केल्यात की त्यांनी त्यांच्या मालकांना भारतात जाण्याची व्यवस्था करण्यास सांगावे.
तालिबानने अफगाणिस्तानची दुसरी प्रांतीय राजधानी शेबर्गन शहर काबीज केलं
तालिबानने अफगाणिस्तानची दुसरी प्रांतीय राजधानी शेबर्गन शहर ताब्यात घेतले आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तालिबान पुन्हा देशात आपले पाय पसरत आहे आणि त्याने अनेक क्षेत्रांवर ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा हिंसाचार सुरूच आहे.
यापूर्वी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शुक्रवारी तालिबान्यांनी हल्ला करून अफगाण सरकारच्या राज्य मीडिया केंद्राच्या संचालकाची हत्या केली. अलीकडच्या काळात सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येची ही ताजी घटना आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा काही दिवसांपूर्वीच देशाचे काळजीवाहू संरक्षण मंत्री यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता.