(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistan Political Crisis: इम्रान खान यांना झटका की सुटका? पाक सर्वोच्च न्यायालय काही वेळातच सुनावणार निकाल
Imran Khan: नॅशनल असेंब्लीच्या उपसभापतींनी अविश्वास प्रस्ताव फेटाळला आणि त्यानंतर संसद बरखास्त केल्या प्रकरणी पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय काही वेळातच आपला निर्णय सुनावणार आहे.
Imran Khan: नॅशनल असेंब्लीच्या उपसभापतींनी अविश्वास प्रस्ताव फेटाळला आणि त्यानंतर संसद बरखास्त केल्या प्रकरणी पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय काही वेळातच आपला निर्णय सुनावणार आहे. पाकिस्तानचे सरन्यायाधीश (CJP) उमर अता बंदियाल यांनी गुरुवारी सांगितले की, पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळणारे नॅशनल असेंब्लीचे उपसभापती कासिम खान सूरी यांचा 3 एप्रिलचा निर्णय चुकीचा होता, हे स्पष्ट आहे.
चौथ्या दिवशी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश बंदियाल यांनी सभागृहात उपसभापतींनी दिलेला निर्णय हा घटनेच्या कलम 95 चे उल्लंघन असल्याचे निदर्शनास आणून दिले. बंदियाल म्हणाले, "पुढे काय होणार हा खरा प्रश्न आहे. ते म्हणाले की, आता पीएमएल-एनचे वकील आणि पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल (एजीपी) खालिद जावेद खान हे याप्रकरणी न्यायालयाला मार्गदर्शन करतील.
सर्वोच्च न्यायालयाची सुरक्षा वाढवण्यात आली
या निर्णयाकडे संपूर्ण पाकिस्तानचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. टेलिव्हिजन फुटेजमध्ये सर्वोच्च न्यायालयाबाहेर पोलिस तैनात दिसत आहे.
काय आहे प्रकरण
नॅशनल असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर कासिम खान सूरी यांनी रविवारी अविश्वास प्रस्ताव नाकारला, कारण तो सरकार पाडण्याच्या तथाकथित परदेशी षडयंत्राशी जोडला गेला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. काही मिनिटांनंतर राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पंतप्रधान खान यांच्या सूचनेनुसार नॅशनल असेंब्ली विसर्जित केली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे.
निर्णयाचा काय होईल परिणाम
न्यायालयाच्या निर्णयामुळे केवळ अविश्वास प्रस्तावाचे भवितव्यच नाही, तर नॅशनल असेंब्लीचे विसर्जन आणि आगामी निवडणुकाही ठरणार आहेत. जर निकाल खान यांच्या बाजूने लागला तर 90 दिवसांत निवडणुका होतील आणि न्यायालयाने उपसभापतींच्या विरोधात निर्णय दिल्यास संसदेचे अधिवेशन पुन्हा बोलावले जाईल आणि खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha