Pakistan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, अटक वॉरंट जारी
Imran Khan Arrest Warrant : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
Imran Khan : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते. न्यायाधीशाला धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी, 30 सप्टेंबर रोजी इम्रान खान इस्लामाबाद सत्र न्यायालयात हजर झाले होते आणि त्यांनी न्यायाधीशाची माफी मागितली होती. इम्रान खान यांनी पोलीस आणि महिला न्यायाधीश जेबा चौधरी यांना एका सार्वजनिक रॅली दरम्यान धमकी दिल्याचा आरोप आहे.
शाहबाज गिल (Shahbaz Gill) यांच्या अटकेविरोधात इम्रान खान (Imran Khan) यांनी 20 ऑगस्ट रोजी इस्लामाबादमध्ये एका रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी पोलीस आणि एका महिला न्यायाधीशाला धमकी दिली होती. या प्रकरणात त्यांच्यावर दहशतवादविरोधी (Anti Terror Act) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कधीही अटक किंवा नजरकैदेत ठेवले जाऊ शकते. त्याने न्यायाधीश आणि पोलिसांना धमक्या दिल्याचा आरोप आहे. रॅलीतील भाषणादरम्यान इम्रान खान यांनी इस्लामाबाद पोलीस महानिरीक्षक आणि न्यायाधीशांना धमकी दिली. त्यामुळे त्यांच्याविरोधात इस्लामाबाद पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकारी आणि न्यायाधीशांना धमकावणे आणि देशातील शांतता भंग केल्याप्रकरणी दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इम्रान खान यांच्यावर काय आरोप आहेत?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर 20 ऑगस्ट रोजी इस्लामाबादमधील रॅली आयोजित करत देशातील परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आणि पाकिस्तानची शांतता व्यवस्था भंग करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. इम्रान खान यांच्यावर इस्लामाबादच्या पोलीस महानिरीक्षकांसह अनेक पोलिस अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोपही आहे. यासोबतच इम्रान खान यांनी इस्लामाबादच्या सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश जेबा चौधरी यांनाही धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इम्रान खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
पीटीआय नेते शाहबाज गिल यांचा कोठडीत छळ
पीटीआय नेते डॉ. शाहबाज गिल यांच्यावर कोठडीत छळ केल्याचा आरोप करत इम्रान खान यांनी ऑगस्ट महिन्यात रॅली आयोजित केली होती. यादरम्यान, इम्रान खान यांनी इस्लामाबादच्या महानिरीक्षक आणि उपमहानिरीक्षकांना धमकी वजा इशारा दिला. यानंतर इस्लामाबादमधील मरगल्ला पोलिस ठाण्यात इम्रान खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. दंडाधिकारी अली जावेद यांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये असं म्हटलं की, इम्रान खान यांनी रॅलीदरम्यान पोलीस अधिकारी आणि एका महिला अतिरिक्त न्यायाधीशांना धमकावलं.